आणि बर्चीबहाद्दर बिथरला !

कोल्हापूरच्या छत्रपतींच्या मालकीचे पूर्वी अनेक हत्ती होते. हे हत्ती किल्ले पन्हाळगड, जुना राजवाडा नवीन राजवाडा राधानगरी येथील हत्तीमहाल अशा वेगवेगळ्या ठिकाणी असायचे. छत्रपती बुवासाहेब महाराजांनी जुन्या राजवाड्यामध्ये नगारखाना बांधला. तेव्हापासून म्हणजेच सन १८३४ पासून नेहमी राजवाड्याच्या नगारखान्यामध्ये दोन हत्ती असायचे. पैकी बर्चीबहाद्दर हा छत्रपतींचा जुन्या राजवाड्यातील शेवटचा हत्ती. १९७० साली बर्चीबहाद्दर निवर्तला व त्यानंतर जुन्या राजवाड्याची गजशोभा लोप पावली.

बर्चीबहाद्दरची कारकीर्द जितकी वैभवशाली तितकेच त्याचे अखेरचे दिवस हृदयद्रावक होते. बर्चीबहाद्दरने छत्रपतींचे वैभव पाहिले, नव्हे ! तर तो छत्रपतींच्या वैभवाचाचा एक भाग होता. त्याने शाहू छत्रपती महाराजांसारख्या लोककल्याणकारी नृपतीला आपल्या पाठीवर बसवून मिरवले होते. मौल्यवान आभूषणांनी सजून आपल्या गजगतीने त्याने कोल्हापूरच्या शाही दसऱ्यात रुबाब आणला होता. आपल्या चित्कारांनी आणि आक्रमकतेने त्याने साठमारीच्या खेळात थरार आणला होता आणि आपल्या मायेने त्याने कोल्हापूरातील अनेक लहानथोरांचे अतोनात प्रेमही मिळवले होते. असा हा बर्चीबहाद्दर म्हणजे छत्रपतींच्या जुन्या राजवाड्याचा एक मौल्यवान अलंकारच होता. भव्य अशा नगारखान्यात उभा असणारा बर्ची नगारखान्याच्या भव्यतेत आणखीनच भर घालायचा. अंबाबाईच्या दर्शनासाठी येणारे, राजवाड्यात छत्रपतींना भेटायले येणारे लोक येताना त्यांच्या लाडक्या बर्ची साठी आठवणीने काहीतरी खाऊ आणायचे. इवल्याशा खाऊने त्याचे पोट थोडीच भरायचे ! पण मन मात्र खचितच तृप्त व्हायचे !

नवीन राजवाड्यातून येणारे तुपातील रोट व छत्रपतींच्या शेतातील हिरवागार चारा होताच की. याशिवाय दररोज माहूत त्याला फिरायला बाहेर घेऊन जायचा तेव्हा वाटेतील विक्रेते वगैरे लोकही त्याला काहीतरी द्यायचेच. असाच एक काळा दिवस उजाडला. दि. २२ जून १९७०, रोजच्याप्रमाणे माहूत बाबालाल महात याने बर्चीला फिरायला नेण्यासाठी बाहेर काढले. सोबत बाबालालचा नऊ वर्षाचा मुलगा वजीरही होता. दोघेही बर्चीबहाद्दरवर आरुढ झाले व राजवाड्याच्या बाहेर पडले. राजवाड्यातील महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलपासून तो मिरजकर तिकटी व बालगोपाल तालमीकडे गेला.

तिथून फिरुन राजवाड्याकडे परतत असताना चव्हाण वाड्याजवळ एकाएकी बाबालाल माहूत हत्तीवरुन खाली पडला व जखमी झाला. बाबालाल यावेळी दारु पिऊन हत्तीवर बसला होता, असेही सांगितले जाते. बाबालाल पडल्याची बर्चीबहाद्दरला जाणीवही झाली नाही. पाठीवर बसलेल्या वजीरला घेऊन तो एकटाच राजवाड्यात परतला. माहूताशिवाय एकटाच आलेला बर्चीबहाद्दर पाहून राजवाड्यातील नोकर गोंधळले व हातात भाले घेऊनच त्याच्यासमोर आले.

बर्चीबहाद्दरने पूर्वी अनेक साठमाऱ्या खेळल्या होत्या त्यामुळे तो भाले पाहून आपल्या जागी न जाता नगारखान्यातून भावसिंहजी रोडवर गेला. हे पाहून पाच सहा नोकर त्याच्या पुढे जाऊन त्याला हुसकावून मागे वळवण्याच्या प्रयत्न करु लागले. हत्तीच्या पाठीवर लहान मुलगा बसलाय, जवळ माहूत नाही आणि नोकरलोक त्याला रोखतायत हे पाहून काहीतरी वेगळं घडतंय असा लोकांचा गैरसमज झाला व लोकांचा एक मोठा घोळका हुर्यो करत हत्तीपुढे आला. हे पाहून अनेक लोक ओरडाओरडा करत हत्तीच्या भोवती गोंधळ करु लागले. आपल्या अशा वागण्याने आपण साठमारीचा माहोल तयार करतोय आणि यामुळे बर्चीबहाद्दर जबरदस्त बिथरु शकतो, याचा लोकांनी अजिबात विचार केला नाही. झालेही तसेच, लोकांच्या या अचानक झुंडीमुळे व दंग्यामुळे आतापर्यंत शांतपणे चाललेला बर्चीबहाद्दर बिथरला आणि महाद्वार रोडवर येऊन त्याने टेलिफोनचा खांब सोंडेने वाकवला.

हे पाहून अतिउत्साही लोकांनी फारच दंगा सुरु केला. यामुळे बर्चीबहाद्दरने दोन रिक्षा उलथवून टाकल्या. बर्चीबहाद्दर पिसाळला म्हणून लोकांनी दंगा सुरु केला. खरंतर लोकांच्या या अनाठायी फाजीलपणामुळेच तो बिथरला होता. बर्चीबहाद्दर पिसाळल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. शहारातील सर्व व्यवहार ठप्प झाले आणि लोकांच्या झुंडी बर्चीबहाद्दरच्या मागेपुढे पळू लागल्या. बर्चीबहाद्दर गंगावेसला आला व त्याने एका गवळ्याची सायकल त्यावर अडकवलेल्या दुधाच्या घागरींसह दूरवर फेकून दिली. तेथून त्याने साकोली कॉर्नरवर येऊन एका ट्रकला जोरदार धडक दिली. हत्तीवर बसलेल्या लहानग्या वजीरची अवस्था दीनवाणी झाली होती. हत्तीच्या गळ्यातील घंटेचा दोर त्याने गच्च पकडून ठेवला होता. शहरातील सर्व पोलिस बंदोबस्तासाठी धावले.

वजीरला खाली उतरवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. बर्चीबहाद्दर ज्या मार्गाने पुढे जातोय त्या मार्गावरील दोन्ही बाजूंच्या इमारतीवर आडवे दोर लावून वजीरला ते पकडण्यास सांगितले जात होते, जेणेकरुन वजीर दोर पकडून राहील व बर्चीबहाद्दर पुढे निघून जाईल. पण वजीरला तो दोर धरण्याचे धाडस होईना. धोतरी तिकटीजवळ तर बर्चीबहाद्दरने आडवा दोरच तोडून दिला. तेथे वजीर हत्तीवरुन खाली पडला व किरकोळ जखमी झाला.

हत्तीभोवती पळणारी लोकांची झुंड पांगवल्यास हत्तीला काबूत आणणे शक्य होईल असे पोलिसांना वाटले व त्यांनी जोरदार लाठीमार करुन गर्दी पांगवली. मोतीबाग तालमीतील पन्नासभर पैलवानांना घेऊन पोलिसांनी बर्चीबहाद्दरला काबूत आणण्याची योजना आखली. यानुसार त्याच्यापुढे गवत व केळीचे घड टाकत टाकत त्याला गंगावेस पापाची तिकटी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व भावसिंहजी रोडमार्गे परत जुन्या राजवाड्यात आणले. बर्चीबहाद्दर राजवाड्यात येताच चारी बाजूंनी रोडरोलर ट्रक व अग्निशामक दलाच्या गाड्या आडव्या लावून तो पुन्हा बाहेर जाऊ नये याची व्यवस्था करण्यात आली. पण सायंकाळी सात वाजता रोडरोलर ढकलून बर्चीबहाद्दर राजवाड्याच्या बाहेर पडला व बिनखांबी गणेश मंदिराच्या दिशेने पळाला. तेथून महाद्वार कसबा गेट गंगावेस शाहू उद्यान तेली गल्ली व टाऊन हॉलमार्गे जैन बोर्डींगच्या आवारात घुसला. तेथून बाहेर येऊन सत्यवादी भवनासमोर तासभर थांबला. त्याठिकाणी भुसनाळे उडवून त्याला लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या दिशेने हुसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. पेटत्या मशाली घेऊन लोक हत्तीच्या मागे धावू लागले.

सदर चित्र बडोदा संस्थानात चालणाऱ्या साठमारीच्या खेळाचा आहे.

काही वर्षांपूर्वी असाच एकदा छत्रपतींचा आवडता हत्ती मदमस्त झाल्यामुळे पिसाळला होता. त्या अवस्थेत तो जेव्हा शहराच्या दिशेने येऊ लागला तेव्हा लोकांच्या जिवीतास व वीत्तास मोठा धोका निर्माण झाला. अशावेळी हत्तीस काबूत आणण्याचा तर विचारच करायचा नाही, त्याला थेट जखमी करुन ठाणबद्धच करावे लागते. हत्तीमुळे जेव्हा लोकांच्या जिवीतास धोका निर्माण झाला तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी थेट आदेश दिले. हत्ती जर शहरात घुसून दंगा करु लागला तर त्याला गोळ्या घाला. त्यावेळी सुदैवाने असे काही करावे लागले नाही कारण हत्ती शहरात घुसण्याआधीच त्याच्यापुढे गवताच्या गंज्या पेटवून त्याला हुसकावण्यात आले व नंतर चिमटे मारुन ठाणबद्ध करण्यात आले.

आताही अशीच परिस्थिती उद्भवली होती. हत्तीपेक्षा लोकांचा जीव व त्यांची सुरक्षितता अधिक महत्त्वाची होती. त्यामुळे बर्चीबहाद्दरला ठाणबद्ध करण्याचे आदेश आले. रात्री साडेदहा वाजता बर्चीबहाद्दरच्या पायात चिमटे मारुन त्याला ठाणबद्ध करण्यात आले. पण तो तसाच संथपणे चालत पुढे जाऊ लागला. अगदी शांतपणे बिंदू चौकमार्गे तो राजवाड्यात आला. पण नगारखान्यातील आपल्या मूळ जागी तो गेला नाही. शहरात रात्री जमावबंदी लागू करण्यात आली.

बर्चीबहाद्दर बिथरला असतानाचे ऐतिहासिक व दुर्मिळ छायाचित्र. बिथरलेल्या बर्चीबहाद्दरच्या मागे दंगा करत लोक धावत आहेत

दुसऱ्या दिवशी बाबालाल महात यांना जखमी अवस्थेतच राजवाड्यात आणण्यात आले. त्यांनी व वजीरने बर्चीबहाद्दरला त्याच्या नगारखान्यातील मुख्य जागी नेले व साखळीने जेरबंद केले.

पूर्वी साठमारीच्या खेळावेळी बर्चीबहाद्दरने अनेकवेळा चिमटे खाल्ले होते. पण चिमटे लावणारे पूर्वीचे साठमार मुळातच तज्ञ होते, ते हत्तीला जखम होऊ न देता चिमटे लावायचे. क्वचित जखम झालीच तर ती लगेच भरुन यायची. पण यावेळी मात्र बर्चीबहाद्दरला आततायीपणे चिमटे लावण्यात आले होते. त्यामुळे ज्या ठिकाणी त्याच्या पायाला चिमटा मारला तिथे त्याला मोठी जखम झाली. दिवसागणिक ती जखम फारच बळावत गेली. बर्चीबहाद्दरच्या हालचाली मंदावल्या. उदास अवस्थेत उभा असलेला बर्चीबहाद्दर व त्याची ती भेसूर जखम पाहून प्रत्येकाचे मन हेलावून जायचे.

त्याचे धनी छत्रपती शहाजी महाराज हे स्वतः मोठे प्राणीप्रेमी होते. त्यांनी अनेक तज्ञ मंडळी आणून, हरतऱ्हेचे प्रयत्न केले पण कशाचाही काहीही उपयोग झाला नाही. दिवसेंदिवस लाडक्या बर्चीची प्रकृती खालावत जाऊ लागली. त्याची अवस्था इतकी वाईट झाली की बर्चीबहाद्दरला मरण देऊन त्याला या मरणयातनांतून कायमचे मुक्त करावे असाही सूर लोकांतून उमटू लागला. बर्चीबहादरच्या या मरणयातना कदाचित त्या पशुपती महादेवालाही पहावल्या नसाव्यात. म्हणूनच त्याने बर्चीला यातून कायमचे मुक्त केले.

दि. ९ अॉगस्ट १९७० रोजी छत्रपतींच्या लाडक्या बर्चीबहाद्दरने अखेरचा श्वास घेतला. ज्याचे असणे नगारखान्याच्या भव्यतेचे कोंदण होते, ती नगारखान्याची भव्यता हरपली. ज्याने दसऱ्याचे शिलंगण गाजवले तो बर्चीबहाद्दर आता परत राजवाड्यात दिसणार नव्हता. ज्याच्या आक्रमक हालचालींमुळे साठमारीचे भक्कम आगडदेखील हादरायचे तो बर्चीबहाद्दर आता कसलीच हालचाल करत नव्हता.

साभार:- अजयसिंह पाटील
Karvir Riyasat
माहितीचे स्त्रोत १) प्रत्यक्षदर्शी मंडळी २) कोल्हापूरच्या पाऊलखुणा लेखक सुधाकर काशिद ३) छत्रपती शाहू स्मृतीदर्शन संपादक हिंदूराव साळुंखे

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *