स्मिता पाटील निखळ सौंदर्याची खाण असलेल्या अभिनेत्री..

स्मिता पाटील यांचा आज जन्मदिवस, एक प्रचंड ताकदीची अभिनेत्री, अवघ्या ३१वर्षे जीवनात अनेक मानसन्मान व पुरस्कार मिळवून अर्ध्यातच या जगाचा निरोप घेऊन सर्वांच्या मनात राहिलेली ही मराठमोळी अभिनेत्री. स्मिता पाटील यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर समांतर तसेच व्यावसायिक सिनेमातही यश संपादन केलंय. दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या अभिनेत्रीला भारतीय सिनेमातील अमूल्य योगदानासाठी पद्मश्रीने सम्मानित करण्यात आले आहे.

स्मिता पाटील यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९५५ पुण्यात झाला. त्यांनी पुण्यातील रेणुका स्वरुप मेमोरियल माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले. त्यांचे वडिल शिवाजीराव गिरधर पाटील हे राजकारणी होते. त्यांच्या आई विद्याताई पाटील या समाजसेविका होत्या. दूरदर्शनवर वृत्‍तनिवेदिका म्‍हणून सुरू झालेला स्मिता पाटील यांचा प्रवास आजही प्रेक्षकांच्‍या आठवणीत आहे. १९७२ साली टेलिविजनवर आलेली स्मिता १७-१८ वर्षाची होती. खासगी आयुष्यात स्मिता या खूपच बिनधास्त होत्या. दुरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून कामाला असताना त्या जीन्स आणि टीशर्टमध्ये तिथे जात असत.

मात्र बातम्या देताना जीन्सवरच साडी परिधान करायच्या असे म्हटले जाते. वृत्‍तनिवेदिका म्‍हणून काम करत असतांना श्‍याम बेनेगल यांनी स्मिता यांच्यामधील अभिनय क्षमता ओळखून त्यांना १९७५मध्ये ‘चरणदास चोर’ या चित्रपटात घेतले. पहिल्‍याच चित्रपटातील त्यांच्‍या अभिनयाचे कौतुक झाले. त्‍यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. विशेष म्हणजे स्मिता पाटील यांचा अभिनयाशी काहीच संबंध नव्हता. त्यांनी अभिनयाचे शिक्षणही घेतले नव्हते. पण तरी वयाच्या विसाव्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणा-या स्मिता या जवळजवळ ७५ चित्रपटांच्या अनभिषिक्त महाराणी ठरल्या होत्या. १९८४ मध्ये त्या आंतरराष्ट्रीय नायिका बनल्या.

श्याम बेनेगल यांच्या ‘चरणदास चोर’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांचे लग्न चित्रपट अभिनेते राज बब्बर यांच्याबरोबर झाले होते. पहिल्या बाळंतपणातच त्यांना मृत्यूने गाठले. प्रतीक बब्बर हा त्यांचा मुलगा. त्याला जन्म देतानाच प्रसूतिपश्चात आजारामुळे डिसेंबर १३, इ.स. १९८६ला त्यांचे निधन झाले. रुपेरी पडद्यावर भारतीय स्त्रीची पर्यायी प्रतिमा साकारणारी सक्षम अभिनेत्री म्हणून स्मिता पाटील यांचे भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात वेगळं स्थान आहे. अल्पायुषी ठरलेल्या स्मिता पाटील यांनी विविध व्यक्तिरेखांच्या संवेदना व त्यांचं व्यक्तिमत्व इतक्या प्रभावीपणे आणि सूक्ष्म बारकाव्यांसह अभिव्यक्त केलं की त्यामुळे पडद्यावरील सौंदर्याच्या रुढ संकल्पना दुय्यम ठरल्या. स्मिता एका राजकीय घराण्यातून पुढे आलेली मुलगी होती. राष्ट्रसेवादलाच्या सांस्कृतिक कार्यात सक्रिय असलेल्या स्मिताने दृकश्राव्य माध्यमाची सुरुवात दूरदर्शनवरील ‘बातमीदार’ या नात्याने केली.

छोटया पडद्यावरुन या भूमिकेवरुन तिचे सुप्त गुण हेरुन श्याम बेनेगल या समर्थ दिग्दर्शकाने तिला ‘निशांत’ आणि ‘चरणदास चोर’ या चित्रपटात अभिनयाची संधी दिली. हिंदी चित्रपटसृष्टीतील पदार्पणानंतर बेनेगल यांनीच दिग्दर्शित केलेल्या मंथन’ आणि ‘भूमिका’ या चित्रपटातील तिच्या भूमिका गाजल्या. यातील कसदार अभिनयामुळे स्मिताला कलात्मक चित्रपट सृष्टीत मान्यता मिळालीच आणि राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला. ‘मंथन मधून स्मिताने सहकारी चळवळीत सक्रिय झालेल्या हरिजन स्त्रीच्या व्यक्तिरेखेमधील सळसळते चैतन्य, आक्रमकता आणि सचोटी याचा सशक्त आविष्कार केला. त्याचप्रमाणे हंसा वाडकर या अभिनेत्रीच्या आत्मकथेवर आधारित ‘भूमिका ‘ मधून तिने पुरुषप्रधान संस्कृतीत शोषित ठरणार्यार स्त्रीच्या संवेदना प्रभावीपणे अभिव्यक्त केल्या.

१९७७ हे वर्ष स्मिता पाटील यांच्या करियरमधील टर्निंग पॉईट ठरले. यावर्षी `भूमिका` आणि `मंथन` हे दोन चित्रपट यशस्वी झाले. दुध सहकारी संघाविरुद्ध बंडाचे नेतृत्व करणाऱ्या हरिजन महिलेची भूमिका श्याम बेनेगल यांच्या “मंथन” (१९७७) चित्रपटातून करत स्मिता प्रकाशझोतात आली. पुढे श्याम बेनेगल यांनी तिला “भूमिका” (१९७७) चित्रपटात मोठी कौशल्यपूर्ण भूमिका प्रदान केली. या कलात्मक चित्रपटांतून त्यांनी नसिरुदीन शाह, शबाना आजमी, अमोल पालेकर आणि अमरीश पुरी सारख्या कसदार कलाकारांसोबत काम करून अभिनयात आपला वेगळा ठसा उमटविला. स्मिता यांनी स्‍त्रीप्रधान भूमिका करून वेगवेगळ्या विषयांकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले. त्‍यामुळे ‘मिर्च मसाला’मधील सोनबाई, ‘अर्थ’मधील कविता सान्‍याल महिलांना आपलीशी वाटली. मराठीतील ‘उंबरठा’ चित्रपटातील सुलभा महाजन म्‍हणजे जणू काही आपल्‍या मनातली एक भावना आहे, असे त्‍याकाळी अनेक महिलांना वाटलं. १९७७ मध्ये तिला भूमिका या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता,त्यानंतर ‘जैत रे जैत’ या मराठी चित्रपटासाठी १९७८ साली राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, चक्र या सिनेमातल्या अम्माच्या भूमिकेसाठीही तिने १९८० साली राष्ट्रीय पुरस्कार मिळवला होता.

वास्तविक हिंदी चित्रपटांमधुन प्रामुख्याने पारंपारिक स्त्री प्रतिमाच चितारल्या गेल्या. तरीही स्मिता पाटीलच्या उदयापूर्वी वहिदा रेहमान, नुतन , सुचित्रा सेन यांनी या चाकोरी पलीकडल्या काही प्रतिमा उभ्या केल्या. स्मिता पाटीलने ही धारा आपल्या अभिनय सामर्थ्याने दृढ केली आणि पुढेही नेली. दलित, शोषित स्त्रियांच्या , बंडखोर स्त्रियांच्या , आंतरिक बळ असलेल्या स्त्रियांच्या प्रतिमा परिणामकारकतेने साकार केल्या. याबाबतीत शबाना आझमी या तिच्या समकालीन अभिनेत्रीनेही योगदान केलं आहे. या अभिनेत्रींनी प्रेयसीच्या रुढ झालेल्या प्रतिमांना पर्यायी अशा प्रतिमा सक्षमतेने आविष्कृत केल्या. वेगळया मूल्यचौकटी व निष्ठा घेऊन जगणार्या अशा व्यक्तिरेखांना या अभिनेत्रींनी एका अर्थाने मान्यताच मिळवून दिली.

स्मिता पाटील चांगल्या अभिनेत्रीसह चांगल्या व्यक्तीही होत्या. त्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव होती. त्या चित्रपट निर्मात्याच्या अडचणी समजून घेत होत्या. एकदा त्यांनी जखमी असतानाही ‘कसम पैदा करने वाले की’ चित्रपटाचे चित्रीकरण थांबविले नव्हते. अभिनेता राज बब्बर यांच्याशी जवळीक वाढल्यामुळे त्यांच्यावर बरीच टीका झाली. त्यावेळी राज बब्बर विवाहित होते. नादिरा बब्बर या त्यांच्या पहिल्या पत्नी होत्या. त्यांच्या डिलीव्हरीच्या वेळी त्यांना ताप आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही तासांतच स्मिता या कोमात गेल्या होत्या.

१३ डिसेंबर १९८६ रोजी प्रतीकच्या जन्माच्या अवघ्या सहा तासांनी, अवघ्या ३१ व्या वर्षी स्मिता यांनी या जगाचा निरोप घेतला. स्मिता पाटील यांची इच्छा होती, की मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह एखाद्या विवाहित महिलेप्रमाणे सजवावा. जेव्हा स्मिता पाटिल यांचे निधन झाले तेव्हा त्यांचा मृतदेह तीन दिवस बर्फात ठेवण्यात आला होता. कारण स्मिता यांची बहीण अमेरिकेमध्ये राहत होती. जेव्हा स्मिता यांच्यावर अत्यंसंस्काराची वेळ आली त्यापूर्वी त्यांचे व्यावसायिक मेकअपमन दीपक सावंत यांनी त्यांच्या मृतदेहाचा विवाहित महिलेप्रमाणे मेकअप केला होता. विशेष म्हणजे त्यांच्या निधनानंतर त्यांचे जवळपास चौदा चित्रपट प्रदर्शित झाले होते.

स्मिता पाटील यांच्या निधनानंतर मास्को, न्यूर्यॉक , फ्रान्समधील विविध महोत्सवांमध्ये तिच्या चित्रपटांचं ‘सिंहावलोकन ‘ झालं. आंतरराष्ट्रीय स्तरावर रसिक व समीक्षकांकडून इतकी मान्यता मिळणारी ती पहिलीच भारतीय अभिनेत्री होती.

वाचा दादा कोंडके व बाळासाहेब यांचे संबंध

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *