खंडेरायाची जेजुरी संपूर्ण इतिहास आणि माहिती नक्की वाचा…

नमो मल्लारीं देवाय भक्तानां प्रेमदायिने ।
म्हाळसापतीं नमस्तुभ्यं मैरालाय नमो नमः ।।
मल्लारीं जगतान्नाथं त्रिपुरारीं जगद‌्गुरूं ।
मणिघ्नं म्हाळसाकांतं वंदे अस्मत् कुलदैवतम् ।।

महाराष्ट्रात खंडोबा आणि कर्नाटकात मैलार या नावाने ओळखला जाणारा हा लोकदेव कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अनुबंधाचे एक प्रकट प्रतीक आहे. ‘मल्लारी मार्तंड भैरव’ हे त्याचे संस्कृत नाव. या देवतेची लोकप्रियता एवढी व्यापक आहे की, धनगर, रामोशांपासून देशस्थ ब्राह्मणांपर्यंत समाजाच्या सर्व थरांत त्याची उपासना प्रचलित आहे. या मंदिराचे दोन भाग असून पहिला भाग हा मंडपाचा आहे. दुसरा भाग हा गर्भगृह असून तेथे खंडोबाचे स्थान आहे. हे मंदिर हेमाडपंथीय आहे. या मंदिरात 28 फूट आकाराचे पितळाचे कासव आहे.

जेजुरीचे ऐतिहासिक महत्व

सह्याद्रीच्या डोंगर रांगा मध्ये घनदाट जंगलात असलेली ही लवमुनीची तपोभुमी दक्षिणे मध्ये मणि मल्ल राक्षसांचे छळाला कंटाळून विस्थापित झालेल्या ऋषीनी येथील लव आश्रमात आश्रय घेतला व मल्ल राक्षसांचे छळा पासून मुक्त करण्याची शंकरांना विनवणी केली.

शंकरांनी या भूमीवर मार्तंड भेंरव अवतार धारण केला. ही भुमी पवित्र झाली. मणि मल्ल वधा नंतर मार्तंडानी येथेच आपली राजधानी वसवली आणि ही भुमी जयाद्री म्हणून प्रसिद्ध पावली. मार्तंड भेंरवाचे अवतार कार्य संपले आणि अनंतकाळ लोटला कडेपठारी प्रस्थानपिठी मार्तंड भेंरव मंदिरात नांदतच होते.

येथेही राजधानी ठिकाणी मार्तंड भेंरवाचे मंदिर उभे राहिले. मंदिरांचे व्यवस्थेसाठी दाने इनामे दिली गेली आणि जयाद्री ची जेजुरी नगरी वसली. लोकश्रद्धा भक्तीतून तिचे वैभव वाढत राहिले.

येथे अनाम भक्तांनी मंदिराची अनेक कामे केली व भव्य मंदिर उभे राहिले. गडावरील मंदिराचे गर्भगृहाचे बाहेरील बाजूस असेलेल्या यक्षमूर्ती खाली मात्र एक भक्त आपली नाममुद्रा सोडून गेला ईस १२४६ चा हा येथील ज्ञात असलेला पहिला शिलालेख

गडाचे पूर्वेचा लोक वस्तीचा भाग जुनी जेजुरी म्हणून ओळखला जातो.पण पायरी मार्ग, कमानी यांचा विचारकरता येथील पायथ्याचे पहिल्या कमानीवर ईस १५११ चा शिलालेख आहे या वरून उत्तरे कडील लोकवस्ती या पूर्वीपासून प्रमुख लोकवस्ती म्हणून अस्तित्वात होते हे निश्चीत.

ईस १५११ मधेच चेंतन्य महाप्रभू नामक बंगाली संताने जेजुरीस भेट दिल्याचे वर्णन आहे या वर्णनात येथे मुरुळीची संख्या मोठी होती व महाप्रभूनी त्यांचे प्रबोधन केल्याचा उल्लेख आहे.एक बंगाली महापुरुष जेजुरीस भेट देतो यावरून याकाळी जेजुरी क्षेत्र म्हणून प्रसिद्ध होती हे निश्चीत.

प्रसिद्ध पावत असलेल्या या जेजुरीच महात्म्य शब्दबद्ध करण्याच काम याच काळात ईस १५४० च्या दरम्यान ज्ञानदेव या लेखकाने “जयाद्री महात्म्य ” या ग्रंथाचे माधमातून केले. ईस १६०८ मध्ये येथील लवथळेश्वर मंदिराचे दुरुस्तीचे काम झालेचें तेथील शिलालेखा वरून समजते. ईस १६५१ – ५२ चें दरम्यान जेजुरी मंदिराच्या पुजाऱ्या मध्ये वादविवाद सुरु झाले व ते जिजाऊ साहेबाकडे कडे निवाड्या साठी गेले जिजाऊनी निवाडा देऊन वाद मिटवले, पुढे ईस १६५३ मध्ये हाच निवाडा शिवाजी महाराजांनी कायम केला.

ईस १६५४ मध्ये पुरंदर मिळवल्या नंतर शिवरायांनी जेजुरीस भेट दिली व एक राजवाडा ही बांधला असे वर्णन चिटणीसांचे बखरीत आहे. याच बखरीत शहाजी महाराजांनी शिवरायाचे स्वराज उभे राहावे म्हणून जेजुरीच्या खंडोबास नवस केला होता व नवसपुर्ती साठी कर्नाटकी कलाकारांकडून सोन्याचे मूर्ती बनवून घेऊन अर्पण केल्या व याच वेळी शहाजी शिवाजी यांची भेट झालेचे बखरकार लिहितो. ईस १७०२ चें एका मुघल बातमीपत्रात जेजुरीचा उल्लेख येतो यात येथील मातीच्या घराचे व गड पायथ्याला असणारे मोठ्या विहिरीचे वर्णन आहे हे चिलावती कुंडाचे असावे.

ईस १७०९ दरम्यान थोरल्या शाहू महाराजांनी जेजुरीस भेट दिली व मल्हार तीर्थाचे जिर्नोधाराचे काम केले. ईस १७११ ते २७ चें दरम्यान तंजावर येथील भोसल्यांनी जेजुरीस भेट दिली व मंदिरास खंडोबा म्हाळसा यांचे मूर्ती अर्पण केल्या.

मल्हारराव होळकर हे आपल्या कर्तुत्वाने सरदार झाले. आपले हे यश खंडोबाचे कृपेने आहे अशी त्यांची श्रद्धा होती या श्रद्धेतून त्यांनी ईस १७३५ मध्ये जेजुरी गडाचे पुनर्निर्माणाचे काम सुरु केले.

मराठ्यांनी पोर्तीगीजावर वसईला मोठा विजय ईस १७३९ मध्ये मिळवला त्या विजयाची स्मृती चिन्हे म्हणून चिमाजी अप्पा व होळकरांनी लुटीतील दोन पोर्तुगीज घंटा येथे खंडोबा चरणी अर्पण केल्या.

वाचा श्रद्धेचे व्यवस्थापन करणारे विश्वस्त

सातारचे छत्रपती शाहू महाराज यांच्या धाकट्या पत्नी आजारी पडल्या त्यांनी जेजुरी भेटीची आस धरली आणि जेजुरीस आल्या जेजुरी येथील मुक्कामात त्या निधन पावल्या माहुली संगम येथे त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ईस १७५० मध्ये मंदिरातील हक्काचे वादातील वीराचे कैफीयती मध्ये वीराचे ते पिंडरीत पहार मारून त्या रक्ताचा टिळा देवास लावीत असल्याचे प्रथेचा उल्लेख आहे

पानसे हे सोनोरीचे सरदार घराणे त्यांचा कुलस्वामी खंडोबा या परिवारातील महिपतराव व रामराव पानसे यांनी नवसपूर्ती साठी देवास ईस १७५० दरम्यान खंडा अर्पण केला

मल्हारराव होळकरांचे मृत्यू नंतरही त्यांनी सुरु केलेले जेजुरी गडाचे पुनर्निर्माणाचे काम तुकोजी होळकरांनी पुढे सुरु ठेवले ते व होळकर तलावाचे काम ईस १७७० पूर्ण झाले.

सवाई माधवराव पेशव्यांचा जन्म झाला व त्याची नवस पुर्ती साठी नाना फडणविसानी खंडोबाचे मूर्तींचा एक जोड येथील खंडोबा मंदिरात ईस १७७४ मध्ये अर्पण केला. ईस १७८५ मध्ये नागपूरकर भोसल्यांनी जेजुरीस भेट दिल्याचे संदर्भ मिळतात. ईस १७९० मध्ये चैत्र पोर्णिमे दिवशी एका दुर्घटनेत गडावर ३०० लोक मरण पावल्याचे एका तत्कालीन बातमीपत्रा मधून समजते

ईस १७९० मधेच विजयादशमी दिवशी मल्हार गौतमेश्वर छत्री मंदिराचे काम तुकोजी होळकरांनी पूर्ण केले. ईस १७९४ मध्ये करवीरचे शंकराचार्यानी जेजुरी मंदिरास एक हत्ती दान केल्याचा संदर्भ मिळतो या वरून जेजुरीस हत्ती वाहण्याची प्रथा होती असे दिसते.

या कालावधीत कोकणातील सोनकोळी जमाती मधील कानू व कमळोजी या दोघा मध्ये जेजुरीच्या खंडोबाचा खरा भगत कोण या वरून वाद निर्माण झाले. हा वाद पेशवे दरबारात गेलेवर हा निवाडा देवाचा असल्याने देवानेच निवाडा द्यावा म्हणून जेजुरीस पाठविण्यात आले व निवाड्या प्रमाणे कनोजी भगतास दरबारातून सनद देण्यात आली

ईस १७९७ मध्ये तुकोजी होळकर यांचा मृत्यू झाला. शिंद्यांनी होळकरांना कबज्यात घेण्याचा प्रयत्न केला. या मधून यशवंतराव होळकर यांनी जेजुरीस आश्रय घेतला.व इंदूरला गेले पुढे पेशव्यांनी यशवंतराव होळकरचें भाऊ विठोजी होळकरांना पुण्यात हत्तीच्या पायी देऊन मारले, या सूडाने यशवंतराव जेजुरीस आले व ईस १८०२ मध्ये जेजुरीतून कूच करून पुण्यावर हल्ला केला पेशवे पुणे सोडून पळाले व यशवंतराव होळकरांनी शनिवार वाडा ताब्यात घेतला.

इंग्रज देशावर राज्य करू लागल्यावर त्यांची विरुद्ध अनेक बंड उभी राहिली त्यातले पहिले बंद उमाजी नाईक यांचे याच परिसरातले. उमाजी नाईक यांनी इंग्रजांचा भांबुरड्या चा खजिना लुटल्यावर तातील काही भाग खंडोबास अर्पण केला. याच उमाजीची इंग्रज शिपाया बरोबर जेजुरीतील डोंगरात ईस १८२६ मध्ये झटापट झाली त्या मध्ये अनेक इंग्रज शिपाई मारले गेले.

ईस १८४४ मध्ये इग्रज अधिकारी आलेक्झाडर न्याश याने जेजुरीस भेट दिली होती त्या वेळेस त्याने होळकर तलावाचे काठावरून जेजुरी गडाचे रेखाचित्र काढले होते, हे जेजुरी गडाचे उपलब्ध चित्रा मधील जुने चित्र आहे.

इस १८५५ ते १८६२ दरम्यान जॉन्सन विल्मम याने काढलेले, सेन्ट्रल युनिवर्सिटी डल्लास, येथील ग्रंथालयातील असलेले हे जेजुरीगडाचे छायाचित्र, आज पर्यंतच्या ज्ञात छायाचित्रा मधील हे सर्वात जुने छायाचित्र आहे.

ईस १८५०-५१ चें दरम्यान तथकथित औरंगजेबाने देवास वाहिलेला सव्वालाखाचा भुंगा चोरीस गेला असा उल्लेख ग्याझेटियर मध्ये मध्ये मिळतो .
येथे मंदिरा समोर बागड घेण्याची प्रथा अस्तित्वात होती ईस १८५६ मध्ये या बागडावर इंग्रजांनी बंदी घातली आणि ही प्रथा बंद झाली.

ईस १८६८ मध्ये यात्रेचे व्यवस्थापना साठी जेजुरी नगर परिषदेची स्थापना करण्यात आली पुढे गावामध्ये पेट्रोमेक्स बत्या व रॉकेलचें दिव्यांचे माध्यमातून दिवाबत्तीची सोय झाली.

jejuri old photo

उमाजी नाईक यांची प्रेरणा घेऊन अनेक क्रांतीकारी तयार झाले. त्या मधील हरी मकाजी नाईक हा एक होय. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कळंबी हे त्याचे गाव अनेक सावकारांना लुटून गोरगरीब जनतेला त्यांच्या कर्जातून त्याने मुक्ती दिली. मार्च १८७९ मध्ये तो इंग्रजांना सापडला त्याला जेजुरी येथे ४ एप्रिल १८७९ रोजी वडाच्या झाडाला लटकावून फाशी देण्यात आले त्यास फाशी दिलेला परिसर आजही फाशीचा माळ म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र शासनाने त्याचे जेजुरीत स्मारक उभारले आहे.

खंडोबारायाचे संबंधित दिन विशेष

रविवार हा खंडोबाचा दिवस मानला जातो. सोमवती अमावास्या, चैत्री, श्रावणी व माघी पौर्णिमा, चंपाषष्ठी व महाशिवरात्र या दिवसांना विशेष महत्त्व आहे. मल्हारी-मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्त्व आले असावे. चैत्री पौर्णिमा हा मार्तंड-भैरवाचा अवतारदिन मानला जातो. श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बानूबाई यांचा विवाह झाला, अशी श्रद्धा आहे. माघी पौर्णिमा हा म्हाळसेचा जन्मदिवस असून, मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबा, ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाल्याची महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील खंडोबाभक्तांची श्रद्धा आहे.

खंडोबाच्या उपासनेत भंडारा (हळदीची पूड) फार महत्त्वाचा आहे. खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी ठोम्बरा (जोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घातलेले), कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात. देवाला नैवेद्य देण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो.

तळी भरणे म्हणजे एका ताह्मणात विड्याची पाने, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताह्मण “सदानंदाचा येळकोट’ किंवा “येळकोट येळकोट जय मल्हार’ असे मोठ्याने तीन वेळा म्हणत उचलतात, नंतर दिवटी-बुधली घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळून प्रसाद वाटला जातो.

खंडोबाला नवस बोलणे व फेडणे याला महत्त्व आहे. त्यातील काही सौम्य नवस असे- मौल्यवान वस्तू देवास अर्पण करणे. दीपमाळा बांधणे. मंदिर बांधणे किंवा जीर्णोद्धार करणे. पायर्‍या बांधणे, ओवरी बांधणे. देवावर चौरी ढाळणे, खेटे घालणे म्हणजे ठरावीक दिवशी देवदर्शनास जाणे. पाण्याच्या कावडी घालणे. उसाच्या किंवा जोंधळ्याच्या ताटांच्या मखरांत प्रतीकात्मक देवाची स्थापना करून वाघ्या-मुरळीकडून देवाची गाणी म्हणवणे, यालाच जागरण किंवा गोंधळ असेही म्हणतात. देवाची गदा म्हणजे वारी मागणे. तळी भरणे, उचलणे, दही-भाताची पूजा देवास बांधणे. पुरण-वरण व रोडग्याचा नैवेद्य करून ब्राह्मण, गुरव व वाघ्या-मुरळी यांना भोजन घालणे. कान टोचणे, जावळ, शेंडी आदी विधी करणे. खोबरे-भंडारा उधळणे, देवाच्या मूर्ती विकणे.

श्री खंडोबारायाची पाच प्रतीके

लिंग : हे स्वयंभू, अचल अगर घडीव असते. तांदळा : ही एक प्रकारची चल शिळा असून, टोकाखाली निमुळती होत जाते. मुखवटे : हे कापडी किंवा पिटली असतात. मूर्ती : या उभ्या, बैठ्या, घोड्यावर. तर काही धातूच्या किंवा दगडाच्याही आढळतात. टाक : घरात पूजेसाठी सोन्याच्या किंवा चांदीच्या पत्र्यावर बनवलेल्या प्रतिमा.

खंडेरायाच्या जेजुरीत दरवर्षीप्रमाणे पारंपारिक पद्धतीने ‘मर्दानी दसऱ्याचे’ आयोजन करण्यात आले येतात. तब्बल 15 तासांपेक्षाही जास्त काळ हा सोहळा चालतो. तब्बल 42 किलोंची तलवार एका हातात जास्तीत जास्त वेळ तोलून धरण्याची आणि दातात उचलून मर्दानी खेळ दाखवण्याची स्पर्धा या ठिकाणी रंगते.

या उत्सवादरम्यान जेजुरी हळदीने न्हाऊन निघते. जेजुरीचा हा उत्सव जगप्रसिध्द आहे. अनेक परदेशी नागरिकही हा सोहळा पाहण्यासाठी येतात. यळकोट यळकोट जय मल्हारच्या गजराने यावेळी गड दुमदुमून निघतो. खंडोबाला शंकराचे अवतार म्हटले जाते. येथे भाविक डोंगरावर अनेक पायऱ्या चढून येतात.

Courtesy:-
Jejuri.in
वाचा महाराष्ट्रातील देवीचे शक्तिपीठे

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *