तुम्ही अनेक वेळेस टि शर्टवर हा फोटो बघितला असेल, जाणुन घ्या या क्रांतिकारी व्यक्तिमत्वा बद्दल..

8 आॅक्टोबर 1967…
“त्याला आजच्याच दिवशी मारलं होतं !”
ब्लॅक कलरची बेरी..
त्यावर तार्याच्या आकाराचा बॅच..
अंगात फौजी युनिफाॅर्म..
छपरी मिशा..
वाढलेली आकर्षक दाढी..

अर्नेस्तो गेवाराचं हे रुप साधारणतः युवा वर्गाला आकर्षित करणारं आणि ओळखीचं आहे.त्याचा चेहरा छापलेले टि-शर्ट्स आणि कॅप्स आज जगभरात हौसेनं वापरले जातात.
अर्नेस्तो गेवारा उर्फ ‘चे’ गेवारा आज जगभरात आवर्जुन वाचला आणि अंगावर घातला जातो.त्याचा चेहरा जगभर क्रांतीचा चेहरा समजला जातो आणि आज क्युबा ह्या लहानशा राष्ट्राची ओळखही फिडेल आणि प्रामुख्यानं गेवाराच्या प्रसिद्धीमुळं जगभरात झाली आहे.

ernesto che guevara

चे हा मार्क्सवादी,साम्यवादी विचारांचा पुरस्कर्ता होता,त्याला भांडवलशाहीचा आणि साम्राज्यवादाचा प्रचंड तिटकारा होता. मार्क्सवादाचा गेवारावरती प्रचंड पगडा होता.पेशानं डाॅक्टर असणारा हा युवक क्रांतीमार्गाकडं वळण्याला कारणीभुत त्याचं मार्क्सवादाचं वाचन आणि लॅटीन अमेरिकन देशांतला त्याचा दुचाकीवरचा दौरा. व्यक्तीचं व्यक्तीद्वारे अथवा एका विशिष्ट वर्गाद्वारे इतर वर्गांचं शोषण यावर तो कडाडुन टीका करी.अमेरिकेचा वाढता साम्राज्यवाद आणि भांडवलशाही यामुळं कुठतंरी गेवाराच्या मनावर खोल परिणाम झाले आणि त्याविरुद्ध तो लढण्याला सज्ज झाला.

अर्नेस्तो चा जन्म 14 जुन 1928 रोजी रोसारिओ,अर्जेन्टीना येथे एका मध्यम उच्चवर्णीयाच्या कुटुंबात झाला. तो एक वैद्यकीय विद्यार्थी होता. त्यानं तरुण वयात लॅटिन अमेरीकन देशांचा दौरा दुचाकीवर त्याच्या मित्राच्या सांगण्यावरुन केला.लॅटिन अमेरिकन देशांमधली गरीबी आणि अमेरिकन कंपन्यांची भांडवलशाही मक्तेदारी अर्नेस्तोने जवळुन पाहीली. फिरती दरम्यान त्याने लॅटिन देशांचे काही विदीर्ण आणि वास्तवदर्शी फोटोही काढले.

ernesto che guevara

तो डिसेंबर 1951 ते जुलै 1952 दरम्यान चिली,पेरु,कोलंबिया आणि व्हेनेझुएला ह्या लॅटिन अमेरिकन देशांतुन फिरला. मार्च 1953 ला त्यानं मेडिकल ची डिग्री मिळवली.ग्रॅजुएशन नंतर तो बोलिव्हियामधे रहायला आला आणि त्यानं तिथं डाॅक्टरकी सुरु केली. 21 सप्टेंबर 1954 ला गेवारा मॅक्सिको सिटी मधे रहायला आला,त्याला तिथल्या सेंट्रल हाॅस्पिटल मधे नोकरी मिळाली होती. 1955 या वर्षात कधीतरी तो निको लोपेझ याला भेटला.या निको ने गेवाराची ओळख फिडेल कॅस्ट्रोचा लहान भाऊ राऊल कॅस्ट्रोशी करुन दिली.
राऊल सोबत समाजवादावर चर्चा करताना आणि अमेरिकेच्या साम्राज्यवादावर टिका करताना त्याने राऊल वर चांगलाच प्रभाव टाकला.

ernesto che guevara

पुढच्याच महिन्यात फिडेल कॅस्ट्रो मॅक्सिकोत सशस्त्र संगठनासंबंधी येणार होता,राऊलने फिडेल आणि अर्नेस्तोची भेट पहिल्याच भेटीत निश्चित केली. जुलै 1955 मधे फिडेल आणि गेवाराची भेट राऊलनी करवुन आणली आणि फिडेलला एक तगडा साथिदार मिळाला. फिडेलने त्याला आपला तिसरा साथिदार घोषित केला. अर्नेस्तो गेवाराला ‘चे’ हे नाव इथंच देण्यात आलं कारण अर्जेंटीना मधे ‘चे’ हे संबोधन सर्रास आणि आदराने एकमेकांसाठी वापरलं जातं आणि गेवारा हा अर्जेंटीना मधे जन्मला होता. चे चा जन्म जरी अर्जेंटीनाचा असला तरी लवकरच तो ‘क्युबा’ या देशाचा महत्त्वाचा क्रांतिकारक म्हणुन ओळखला जाणार होता. लवकरच फिडेल क्युबावरती बाहेरुन हल्ला करणार होता.त्याने चे ला क्रांतिकारक सैन्याच्या तिसर्या तुकडीचा कॅप्टन नेमला.

ernesto che guevara

क्युबन भाषेत ते कॅप्टन ला “कोमान्दते”/Commondante असं म्हणायचे.आजही गेवाराला ते Commandante च म्हणतात. साधारण तीन तुकड्या क्युबावर हल्ला करणार होत्या ज्यातल्या पहिल्या तुकडीचा कॅप्टन होता स्वतः फिडेल कॅस्ट्रो,दुसरीचा राऊल कॅस्ट्रो आणि तिसरीचा ‘चे’ गेवारा. क्युबाचा सत्ताधारी बतिस्ता हा अमेरिकेचा बाहुला होता क्युबाला स्पेनकडुन स्वतंत्र करुन मग अमेरीकेने त्यावर ताबा घेऊन आपला बाहुला ‘बतिस्ता’ याला सत्तेवर बसवला होता,त्यामुळंच फिडेलचा त्याच्यावर राग होता. ही क्रांतिकारकांची फौज क्युबाच्या किनार्यावर पोहण्याची खबर कशी तरी या बतिस्ता ला लागली.त्यानं यांच्यावर हल्ला केला.

ernesto che guevara

आधीच किनार्यापासुन अडीच मैल दुर भलत्याच ठिकाणी दलदलीत उतरल्यानं या बागी फौजेचे हाल चालु त्यात समोरुन गोळीबार यामुळं 82 जणांचं हे सैन्य आता फक्त 12 जणांपुरतं उरलं होतं. चे चं सैन्य लपत छपत इस्काब्रे पर्वतरांगांमधे येऊन लपलं याच दरम्यान फिडेल आणि राऊल आपापली माणसं घेऊन त्याला येऊन मिळाली.आता साथिदार कमी असल्यानं बतिस्ताच्या फौजेशी गुरिला वाॅरफेयर म्हणजेच गनिमी काव्याने लढण्याचं ठरलं तसंच नवे सदस्य भरती करुन त्यांना ट्रेनिंग पुरवण्याचं काम चे कडे देण्यात आलं. डिसेंबर 1958 मधे गेवाराच्या ग्रुपनं क्युबातल्या लाॅस विलास भागातली बरीच खेडी गनिमीकाव्यानं लढुन जिंकली. 28 डिसेंबरला लाॅस विलासची राजधानी “सान्ता क्लारा” ची महत्वपुर्ण लढाई सुरु झाली.
1 जानेवारीला गेवारा लढाईत जिंकला आणि सान्ता क्लारा आता क्रांतिकारी फौजेच्या ताब्यात होतं दरम्यान फिडेल कॅस्ट्रोनं हवानामधे(क्युबाची राजधानी) बतिस्ताच्या सैन्याविरोधात लढाई सुरु केली होती.

ernesto che guevara

त्यानं गेवाराला तात्काळ हवानाला येऊन मिळण्याचे आदेश दिले. 2 जानेवारीला गेवाराच्या फौजेनं बतिस्ताच्या सैन्याचं मुख्य ठाणं ला कबाना काबीज केलं. 8 जानेवारीला हजारो लोकांसोबत फिडेल कॅस्ट्रो हवानामधे थेट घुसला. 9 जानेवारीला क्रांतिकारी फौजा जिंकल्या आणि क्युबा स्वतंत्र झाला. 16 जानेवारीला फिडेल कॅस्ट्रो क्युबाचा राष्ट्राध्यक्ष झाला.
1959 च्या जुन पासुन ते सप्टेंबर पर्यंत अर्नेस्तो गेवारा हा युरोप,आफ्रिका आणि आशिया खंडातल्या विविध देशांना भेटी देऊन प्रामुख्यानं तिथली अर्थव्यवस्था पहात होता,याचदरम्यान त्याने आशियायी आणि युरोपियन देशांशी बरेच व्यापारविनिमयाचे करार केले. याच काळात तो भारतातही येऊन गेला होता. 7 आॅक्टोबर 1959 रोजी गेवारा ला क्युबाच्या औद्योगिक विभागाचा प्रमुख म्हणुन नेमण्यात आलं. 8 मे 1960 रोजी क्युबा आणि सोव्हिएत युनियन यांनी राजकीय संबंध प्रस्थापित केले,यात प्रामुख्यानं गेवाराचा पुढाकार होता आॅक्टोबर 1960 मधे गेवाराने सगळ्या क्युबन बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. 3 जानेवारी 1961 ला अमेरिकेने क्युबासोबतचे सारे औद्योगिक आणि राजकीय संबध तोडुन टाकले यामुळं क्युबाची आर्थिक नाकाबंदी होईल असं सदैव क्युबाला पाण्यात पहाणार्या अमेरिकेला वाटलं पण लगेच 6 जानेवारीला अर्नेस्तो गेवाराने बहूतांश महत्वाचे आर्थिक आणि औद्योगिक करार रशिया सोबत केले यामुळं अमेरिकेची क्युबा विरोधी धोरणं बोथट झाली आणि 16 जानेवारीला अमेरिकेनं क्युबावरचा बहिष्कार उठवला पण आता उशीर झाला होता. फेब्रुवारीच्या 23 तारखेला अर्नेस्तो गेवाराने क्युबामधे स्वतंत्र औद्योगिक मंत्रालयाची स्थापना केली.

ernesto che guevara

1962 च्या आॅगस्ट आणि सप्टेंबरमधे गेवाराने दोनवेळा सोव्हिएत युनियनचे दौरे केले आणि क्युबात रशियन अण्वस्त्रे लावण्याची योजना आखली. ही योजना अतिशय धाडसी आणि अमेरिकेला डिवचणारी होती पण अमेरिकेनं आजपर्यंत क्युबाची हरप्रकारे नाकाबंदी करण्याचा प्रयत्न केला होता याच कारणामुळं गेवाराने हे धाडसी पाऊल उचललं होतं.या घटनेचा जगभर प्रचंड गाजावाजा झाला होता.अमेरिकेची जगात नाचक्की होत होती. रशियाची ही क्षेपणास्त्रे खुलेआम क्युबन नॅशनल टि.व्ही. वर दाखवली गेल्याने अमेरिकेने जगभर क्युबा आणि फिडेल कॅस्ट्रोवर आगपाखड करायला सुरुवात केली कारण क्युबा हा भौगोलिक दृष्ट्या अमेरिकेच्या जवळचा देश होता म्हणजे रशियन अण्वस्त्रे ही क्युबानं अमेरिकेवर टाकलेल्या दबावतंत्राचा एक भाग होती पण आॅक्टोबर 1962 मधे रशियात निवडणुका होऊन सरकार बदललं आणि अमेरिकेशी तह करुन रशियानं ही क्षेपणास्त्रे परत आणवली. जुलै 3,1963 ला गेवारा नं अल्गेरिया ह्या पारतंत्र्यात असलेल्या राष्ट्राला भेट दिली. मार्च 1964 मधे त्यानं UN काॅन्फरन्स जिनिव्हा,स्वित्झर्लंड मधे अमेरिकेच्या साम्राज्यवादी वर्चस्वावर जोरदार टिका केली. 1965 मधे त्यानं अल्गेरीया,माली,काॅन्गो,जिनिया,घाना,टांझानिया आणि इजिप्तला भेटी दिल्या. 1 एप्रिल 1965 ला गेवारा अंतरराष्ट्रीय स्वातंत्र्य मोहीमेवर निघुन गेला आणि क्युबा व फिडेलला एक शुभेच्छा पत्र लिहीलं.ज्यात तो आपण क्रांतीसाठी आणि सदैव लढण्यासाठीच बनलो असल्याचं सांगतो.

ernesto che guevara

क्यूबा सोडल्यानंतर गेवारा पुन्हा एकदा सशस्त्र क्रांतिकारकांचा समुह बनवतो आणि साम्राज्यवाद्यांच्या जोखडात अडकलेल्या देशांना सोडवण्यासाठी कंबर कसतो. 1967 च्या आॅक्टोबरच्या पहिल्या आठड्यात बोलिव्हीयामधे लढताना गेवाराचा ग्रुप पकडला जातो आणि दिनांक 8 आॅक्टोबर 1967 ला त्याला CIA ह्या अमेरिकन गुप्तचर यंत्रणेकडुन प्रशिक्षण घेतलेल्या बोलिव्हीयन आर्मीद्वारे मारलं जातं. कमांडर चे गेवारा हा आयुष्यात नेहमी झुंजार प्रवृत्तीचा राहिलाय जणु त्याला क्रांतीची आणि लढण्याची नशा होती.
कारण मुळचा तो अर्जेंटीनाचा पण आयुष्यभर लढला क्युबाच्या स्वातंत्र्यासाठी.वस्तुतः त्याचं क्युबाशी काही एक घेणं नव्हतं.तरीही तो लढाईत पडला कारण तो समाजवादी आणि साम्राज्यवाद विरोधी विचारांचा आणि मानवतेचा पुरस्कर्ता होता. क्युबा स्वतंत्र झाल्यावरही तो शांत बसला नाही तर अमेरिकेला हिसका दाखवण्यासाठी त्यानं सोव्हिएत युनियनची क्षेपणास्त्र सरळ क्युबात आणवली या घटनेनं तर अमेरिकेचं टाळकं हललं होतं. भांडवलशाहीचा कट्टर विरोधक असल्याने त्यांनं क्युबातल्या बँकांचं आणि उद्योगांचं राष्ट्रीयकरण केलं आणि क्युबन अर्थव्यवस्थेला झळाळी आणली पण मुलतःच लढवय्या होता तो, पुन्हा निघाला जगाच्या पाठीवरच्या पारतंत्र्यातल्या देशांना मदत करायला. खरंतर इथंच त्याचं वेगळेपण सिद्ध होतं तो अल्पसंतुष्ट नव्हता जर असता तर क्युबाच्या स्वातंत्र्यानंतर परत त्यानं हत्यार उचललं नसतं पण मुळातच मानवतावादी असलेला गेवारा परत निघाला गनिमीकावा साम्राज्यशाहीविरोधात वापरायला. अमेरिकेच्या रडावर तर तो फिडेल कॅस्ट्रोला भेटल्यापासुनच होता पण गेवारा एकटा CIA ला सापडत नव्हता.सुरुवातीला डाॅक्टर म्हणुन सामिल झालेला चे कधी कमांडन्ट झाला हे त्याचा इतिहास वाचता वाचताही लक्षात येत नाही. चे आपल्या सैन्यात कधीच 18 वर्षांच्या खालच्या आणि लिहीता वाचता न येणार्या मुलांना घेत नसे. पण याला एक 16 वर्षाचा अमेरिकन छोकरा अपवाद होता तो रिबेलियन आर्मीत सामिल करुन घ्या अथवा मला गोळी घाला असाच हट्ट धरुन बसला,गेवाराने त्याला सामिल करुन घेतला खरा पण दोन वर्षे त्याच्या हातात रायफल दिली नाही तसंच धावपळीच्या काळात स्वतः गेवारा त्याला लिहायला वाचायला शिकवायचा. अमेरिका कॅस्ट्रो आणि गेवारासाठी जंग जंग पछाडत होती CIA कित्येक मिशन लाॅन्च करत होती पण हे दोघं काही सापडत नव्हते.

ernesto che guevara

शेवटी CIA ला गेवारा बोलिव्हीयात सापडला आणि त्यांनी गेवाराला प्रचंड टाॅर्चर करुन तिथेच मारुन टाकला. पण अर्नेस्तो गेवारा उर्फ चे हा युरोप,आशिया मधे प्रचंड गाजला,ज्याला अमेरिका मारु पाहत होती त्याला अमेरिका मारु तर शकली पण आज गेवाराचं वेड अमेरिकेतही प्रचंड आहे. क्युबा या लहानशा राष्ट्राला जगाच्या पाठीवर अमेरिकेशी झुंजणारं राष्ट्र म्हणुन गेवाराने नावलौकीक मिळवुन दिला. गेवाराच्या मृत्युने कॅस्ट्रो प्रचंड विचलीत झाला होता कारण तो त्याचा जिवाभावाचा साथिदार होता. तरुण असताना दोघांनी मॅक्सिकोत बसुन स्वतंत्र क्युबाचे मनसुबे ठरवले होते. गेवाराच्या मृत्युनंतर कॅस्ट्रो प्रत्येक भाषणात गेवाराची आठवण काढायचा आणि अमेरिकेला लाखोली वहायचा. गेवाराने तरुण असताना नेहरुंचं लिखाण वाचलं होतं,त्याच्या आशिया दौर्यात त्यानं भारताला स्वतंत्रपणे काही दिवस भेट दिली आणि भारतीय अर्थव्यवस्था नीट समजुन घेतली. गेवाराचा भारतीय दौरा हा एक लिखाणाचा स्वतंत्र विषय आहे. त्यानं स्वतःनं भारताबद्दल भरपुर लिहीलंय.

ernesto che guevara

गेवाराला ट्रिब्युट म्हणुन एक गाणं तयार केलं गेलं आहे ज्याचं नाव आहे Hasta Seimpre
याचे लिरीक्स समजायला वेळ लागेल पण यातले रिव्होल्युशनरी,कोमान्दन्ते वगैरे शब्द लक्ष देऊन ऐकल्यास कळतात.
या गाण्याचा निश्चित अर्थ सांगता येणार नाही कारण भाषा कळत नाही पण चे गेवाराचं ट्रिब्युट आहे हे मात्र खरं.
सोबत यु ट्युब लिंक देतोय आवर्जुन पहा.
हे ओरिजनल आहे >> https://youtu.be/dr_g23qi9hg
हे त्याचं रिमेक version आहे सुंदर केलंय Original पेक्षा >> https://youtu.be/SSRVtlTwFs8

कमांडर अर्नेस्तो गेवारा (चे) यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.

साभार-विशाल गवळी

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *