22 वर्षीय दिव्यांग तरुण बनला गावचा थेट सरपंच..

राज्यातील सरपंचाची निवडणूक ग्रामपंचायत सदस्यांऐवजी थेट जनतेतून करण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारने घेतला. तसेच सरपंच पदाची निवडणुक लढवण्यासाठी किमान सातवी इयत्ता पासची अट घातली. या अगोदर राज्यात निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंचाची निवड करण्यात येत असे. देशातील गुजरात आणि मध्ये प्रदेशसारख्या राज्यात फार पूर्वीपासून सरपंचाची निवड थेट जनतेमधून करण्यात येते. नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून करण्यात आली होती.

या निर्णयामुळे गावातील राजकारणाला एक वेगळे वळण मिळाले आहे.यापूर्वी गावातील प्रस्थापित लोकांचच निवडणुकीवर वर्चस्व असायचं. राजकारणात नव्याने येणाऱ्या तरुणांसाठी हि अत्यंत आनंदाची बाब आहे. थेट जनतेमधून निवडून सरपंच होण्याचा मान अनेक कर्तृत्ववान लोकांना होत आहे. असाच एक 22 वर्षीय दिव्यांग तरुण बनला आहे मंगरूळ पीर तालुक्यातील शेंदूरजना मोरे या गावचा सरपंच. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना फक्त आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे अविनाश अशोक धांमदे यांना जनतेमधून गावचे थेट सरपंच होण्याचा मान मिळाला आहे. विशेष म्हणजे गावात त्यांच्या कलाल समाजाचे फक्त एकच घर आहे. अविनाशच्या विरोधात निवडणूक लढवणारे संतोष मोरे हे पूर्वीपासून गावाच्या राजकारणात आहेत. त्यांनी हि अविनाश धांमदे यांचे विजयासाठी अभिनंदन केले आहे. या थेट निवडीमुळे सरपंच किंवा उपसरपंच निवडून आल्याच्या दिनांकापासून दोन वर्षापर्यंत व ग्रामपंचायतचा कार्यकाळ संपण्याच्या अगोदर सहा महिने कोणताही अविश्वास ठराव आणता येणार नाही. तसेच यादरम्यान च्या काळात जर अविश्वास ठराव फेटाळला गेल्यास त्यांनतर पुढील 2 वर्षे कोणताही अविश्वास ठराव आणता येणार नाहीये. याचा थेट फायदा अविनाशला झाला आहे. तो कोणत्याही विरोधाशिवाय गावामध्ये विकासकामे करू शकतो.

शेंदूरजना मोरे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अविनाश अशोक धांमदे यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार संतोष मोरे यांच्यावर फक्त एक मताने विजय मिळवला आहे. अविनाश यांना 522 तर संतोष मोरे यांना 521 मते मिळाली. त्यामुळे गावामध्ये जास्तच उत्साहाचे वातावरण तयार झाले होते. अविनाश धांमदे हे दोन्ही पायांनी अपंग आहेत. निवडणूक लढवण्यासाठी सातवीपर्यंतचे शिक्षण बंधनकारक आहे. अविनाश यांचे शिक्षण आठवीपर्यंत झाले आहे. त्यांच्या या निवडीमुळे ते गावात व परिसरात चर्चेचा विषय बनले आहेत. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *