उदयनराजेंच्या आयुष्यातील या 10 वादग्रस्त घटना माहिती आहेत का?

उदयन राजे बस नाम ही काफी है. उदयन राजे म्हटलं की डोळ्यासमोर येते त्यांची हटके स्टाईल, त्यांचे बेधडक डायलॉग. उदयन राजे लोकांच्या भावना लोकांच्या शब्दात मांडतात. त्यांच्या याच खास शैलीमुळे ते लोकांना भावतात.

Udayan Raje

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज. 6 फूट उंच आणि भारदस्त शरीरयष्टी. उदयन राजेंच व्यक्तिमत्त्व खरोखरच राजेशाही आहे. जीन्स त्यावर एखादा कॅज्यूअल शर्ट आणि पायात कोल्हापुरी चप्पल हा उदयन राजेंचा फेव्हरेट ड्रेसकोड. आपल्या हलक्या स्टाइलमुळे आणि बोलण्याच्या पद्धतीमुळे उदयन राजे हे स्टाईल आयकॉन झालेत. त्यांच्या चालण्या बोलण्यात राजाचा रुबाब क्षणाक्षणाला जाणवतो.

Udayan Raje Bhosale

लोकांशी मिश्कीलपणे बोलायला ही महाराजांना आवडते. उदयनराजे असं नाव ऐकल्यावर अगदी हाय-फाय माणूस असं एखाद्याला वाटेल पण वस्तुस्थिती त्याच्या अगदी विरुद्ध,लोकप्रतिनिधींच्या वागण्या बोलण्यात जी औपचारिकता असते ती उदयन राजेंच्या वागण्यात नाही. उदयन राजेंची स्वतःची अशी खास वेगळी शैली आहे, आनंद साजरा करण्याची किंवा राग व्यक्त करण्याचीही. आणि याच शैलीमुळे उदयन राजे सामान्यांना भावतात.

Udayan Raje Bhosale

उदयन राजे हे अनेक वेळा वादातही सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी एका खंडणीच्या गुन्ह्यात त्यांना अटकही झाली होती. आता 2 दिवसापूर्वी आनेवाडी टोलनाक्यावरून खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या समर्थकांत धुमश्चक्रीनंतर उदयन राजे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. यापूर्वीही उदयन राजे अनेक वेळा वादात सापडले आहेत. पाहूया त्यातल्या काही मुख्य घटना-

1- शरद लेवे खून प्रकरण-

1999 मध्ये युती सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री असताना उदयन राजेंना या खून प्रकरणात अटक झाली होती. साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शरद लेवे यांचा खून झाला झाला होता. त्यांच्यासह अन्य 15 लोकांवर या हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. 11 सप्टेंबर 1999 ला लोकसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी चाकूने वार करून शरद लेवे यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात उदयन राजेंना 22 महिने हॉस्पिटलमध्ये नजरबंद ठेवण्यात आले होते. अटकेआधी उदयन राजेंनी पोलिसांशी अरेरावी केली होती, असा दावा निवृत्त वरीष्ठ पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांनी केला आहे.

2.सरकारी अधिकाऱ्यांना गोळ्या घालू अशा धमकी-

2001 साली कोर्टाने सातारा नगरपालिकेवर जप्तीचे आदेश दिले होते. त्यावेळी संतापलेले उदयन राजे नगरपालिकेत आले आणि थेट सीईओच्या खुर्चीवर जाऊन बसले. त्यावेळी उदयनराजेनी सरकारी अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. या अधिकाऱ्यांना ‘गोळ्या घालू’ अशी धमकी दिल्याच्या बातम्याही काही वृत्तपत्रांनी दिल्या होत्या.

3. पोलीस स्टेशनमध्ये शिवीगाळ-

2002 साली एका कार्यकर्त्याला झालेल्या अटक प्रकरणात पोलिसांना शिवीगाळ करून बळजबरीने त्या कार्यकर्त्याला सोडवल्याचा आरोप उदयनराजेंवर करण्यात आला होता. याप्रकरणी उदयनराजे विरुद्ध गुन्हा ही दाखल करण्यात आला होता.

4. ‘मी आहे इथे.. डॉल्बी चालू करा”-

2008 साली गणेश मिरवणुकीमध्ये रात्री उशिरापर्यंत मोठ्याने गाणी वाजवल्यामुळे 56 गणेश मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. कारण रात्री 12 नंतर लाऊडस्पीकरवर गाणी वाजवायला बंदी असताना उदयन महाराजांनी कार्यकर्त्यांना गाणी सुरू ठेवण्याचा आदेश दिला होता. पुढे काही वर्षांनी मिरवणुकीदरम्यान डॉल्बी लावण्यावर बंदी घालण्यात आली.

5. पक्षबिक्ष गेला खड्यात-

उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. 2009 साली उदयन महाराज लोकसभेवर पहिल्यांदा निवडून गेले. त्यावेळी पुण्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात त्यांच्याकडे काहीसं दुर्लक्ष झालं. त्यांनतर संतापलेलेले उदयनराजे त्यातून बाहेर पडले. नंतर पुण्यात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी ‘पक्षबिक्ष गेला खड्यात, साताऱ्याची जनता हाच माझा पक्ष. उदयनराजे स्वतंत्र आहेत. मी राष्ट्रवादीकडे तिकीट मागायला गेलो नव्हतो असं विधान केलं.

6. शर्ट काढला-

2010 साली एका बॉडीबिल्डिंग स्पर्धेला उपस्थित असताना उदयनराजेंनी शर्ट काढून पोझ दिली होती. नंतर ही वर्तवणूक योग्य आहे का, याविषयी त्यावेळी बरीच चर्चा झाली होती.

7. दारू पिऊन पत्रकार परिषद-

उदयनराजे अनेक वेळा ते दारू पिऊन पत्रकार परिषद घेतात असे आरोप झाले आहेत. 2011 साली एका पत्रकार परिषदेत ते एकावर एक खुर्च्या ठेवून त्यावर जाऊन बसले होते. प्रत्येक खुर्ची एक पक्षाची आहे असं ते म्हणाले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांना दिलेल्या उत्तरावरुन ते दारू पिलेले होते असा आरोप त्यांच्यावर झाला होता. त्यानंतर उदयनराजेंनी दिल्लीत दुसरी पत्रकार परिषद घेऊन या आरोपांचे खंडन केले होते.

8. काचा फोडल्या-

सुशील मोझर नावाच्या व्यक्तिविरोधात आंदोलन उदयन महाराजांनी केले होते. उदयन महाराजांवर मोझर यांच्या गाडीच्या काचा फोडल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

9. जेम्स बॉंडसारखे फोटो-

2014 साली उदयन महाराजांनी आपल्या सुरक्षा रक्षकांची पिस्तुल गंमत म्हणून बघायला घेतली आणि आपले जेम्स बॉण्ड सारखे फोटो काढून घेतले. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी झाली होती.

10. उद्योजकाला मारहाण-

सोना अलाईज या कंपनीचे मालक रविंद्रकुमार जैन याना मारहाण केल्याप्रकरणी उदयन राजेंविरुद्ध पोलीस तक्रार दाखल करण्यात आली. उदयनराजेंवर खंडणी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी याबाबत उदयनराजेंसह अन्य 10 जणांवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी उदयनराजेंना अटक झाली आणि नंतर जामीन मिळाला.

हे सर्व गुन्हे उदयनराजेंची लोकप्रियता पाहून राजकिय हेतूने प्रेरित असल्याचे बोलले जाते. उदयनराजेंप्रति लोकांमध्ये असणारी प्रचंड लोकप्रियता मात्र तीळमात्र ही कमी झाली नाही आणि होणारही नाही.

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *