शिवचरित्रातील सर्वात महत्वाची मोहीम: दक्षिण दिग्विजय मोहीम

शिवाजी महाराजांच्या युद्धाच्या, पराक्रमाच्या आणि मुत्सद्देगिरीच्या अनेक प्रेरणादायी ऐतिहासिक घटना आपल्याला माहिती आहेतच. महाराजांनी आणि त्यांच्या शूर सरदारांनी, मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ करून स्वराज्य उभे केले. रक्ताचे पाणी करून स्वराज्याचे वीट आणि वीट शाबूत ठेवण्याचा अविरत पराक्रम केला. स्वराज्यावर चालून येणारे संकट शिताफीने हाताळून,त्यांचा योग्य तो बंदोबस्त केला जायचा. त्याच शिवकाळातील काही न उलगडलेल्या घटनांचा अभ्यास आजही सुरू आहे. त्यासंबंधी उपलब्ध असलेली साधने, कागदपत्रे अभ्यासून महाराजांच्या अतुलनीय कालखंडाची ओळख जगाला झाली, होत राहील. स्वराज्याच्या बळकटीसाठी महाराजांच्या कारकिर्दीत असंख्य यशस्वी मोहीमा पार पडल्या. त्यावरून शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची महती कळते. त्यातल्याच एका प्रदीर्घ मोहिमेबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत,ती मोहीम म्हणजे दक्षिण दिग्विजय अर्थातच,”कर्नाटक मोहीम”.

Dakshin Digvijay Mohim

८ एप्रिल १६७८ रोजी दक्षिण दिग्विजय मोहीम यशस्वी करून छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावर पोहचले. दक्षिण दिग्विजय मोहीम म्हणजे सध्याचा कर्नाटक व तामिळनाडू चा बराचसा भाग शिवरायांनी जिंकून घेतला. ही मोहीम तब्बल दीड वर्षे चालू होती तामिळनाडू ‘वेल्लोरचा किल्ला’ सोडला तर महाराजांना इतर ठिकाणी जास्त त्रास झाला नाही आणि कालांतराने तोही किल्ला मराठ्यांनी जिंकला. तब्बल दीड वर्ष राजे स्वराज्याबाहेर दक्षिणेत होते. मोहीम विजयी करून राजे ८ एप्रिल १६७८ रोजी पन्हाळ्यास परतले.

dakshin-digvijay-route

शिवचरित्रातील सर्वात महत्वाची मोहीम म्हणूनही छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली हि दक्षिण दिग्विजय मोहीम ओळखली जाते. दक्षिण दिग्विजय मोहिमेला निघण्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुतुबशाहीतील वकीलामार्फत कुतुबशाह बरोबर बोलणी केली. कुतुबशाहीचा कारभार मदाण्णा आणि अक्काण्णा या प्रधानांच्या हातात होता. त्यांनी कुतुबशाहशी बोलून छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर मैत्री करण्यात त्याचा फायदा आहे हे पटवून दिले. तसेच दक्षिणेकडे निघण्यापुर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना मोगलांच्या आघाडीवर शांतता आवश्यक होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी निराजीपंतला बहादुरखानकडे धाडले. निराजीपंताने बहादुरखानला दागदागिने व इतर भेटवस्तु दिल्या. त्याने मोगलांबरोबर गुप्त करार केला की छत्रपती शिवाजी महाराज आदिलशाहीच्या दक्षिणेतील प्रदेश जिंकण्यासाठी गेले असताना मोगलांनी स्वराज्यावर आक्रमण करु नये. मोगलांचे स्वराज्यावरील आक्रमण थोपवणे आणि कुतुबशहाशी हात मिळवणी करत दक्षिण मोहीम यशस्वी करण्याच्या योजनेत छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकीय मुस्तद्दीपणा, बुद्धीचातुर्य आणि परराष्ट्रनिती धोरण हे पैलू ठळकपणे जाणवतात. शेवटी योग्य वेळ साधत दक्षिणेकडील राजकारण अनुकूल होताच स्वराज्याची पूर्ण व्यवस्था करून छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयासाठी रायगडाहून कूच केले…

कमी कालावधीत सर्वात जास्त किल्ले आणि क्षेत्र जिंकून घेत स्वराज्याचा विस्तार करणाऱ्या दक्षिण दिग्विजय मोहमेसाठी आजच्याच दिवशी ६ ऑक्टोबर १६७६ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रस्थान केले.
-राज जाधव

आपणास ही माहिती आवडल्यास शेअर करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *