स्वतःच्या अटींवर जगणारा सामुराई

डॅनी डेंझोग्पाचं बॉलिवूडमध्ये येऊन यशस्वी होणं हे दोन अर्थांनी फार महत्वाचं आहे. एक तर कुठल्याही फिल्मी घराण्याची पार्श्ववभूमी नसताना आणि गॉडफादर नसताना तो इथे आला आणि यशस्वी झाला. दुसरं त्याहून महत्वाचं म्हणजे तो अशा भागातून आला आहे जो प्रदेश म्हणायला तर भारतात आहे पण त्या भागातून आलेल्या लोकांना इथं (त्यांच्या भाषेत ‘इंडियात ‘) वारंवार मानखंडनेला सामोर जावं लागत. डोळे उघडे ठेवून आजूबाजूला बघितलं किंवा वर्तमानपत्र वाचली तरी कळत की नॉर्थ ईस्ट मधून आलेल्या लोकांना आपण किती वाईट वागणूक देतो. एक दोन वर्षांपूर्वी दिल्लीच्या मार्केटमध्ये भावामध्ये घासाघीस केली म्हणून अरुणाचल प्रदेशाच्या एका मंत्र्याच्या मुलाला दुकानदाराने बुकलून क्रूरपणे मारलं होत. मंत्र्याच्या मुलाची ही अवस्था तर सर्वसामान्य जनतेचे काय हाल असतील. डॅनी जेंव्हा पुण्यात एफ टी आय मध्ये शिकायला आला होता तेंव्हा पण आपल्या लोकांकडून त्याला अतिशय हिणकस आणि वाईट वागणूक मिळाली होती. डॅनी जेंव्हा पुण्यात होता तेंव्हा नुकतंच भारत चीन युद्ध भारताच्या दारुण पराभवाने संपुष्टात आले होते. चीनबद्दल भारतीय जनमानसात प्रचंड राग होता. डॅनीच्या चेहऱ्याच्या वेगळ्या ठेवणीमुळे त्याला लोक चिनी समजायचे.

अनेक महिने डॅनीने एफ टी आय च्या कॅम्पसच्या बाहेर पाऊल टाकलेच नाही. कारण जेंव्हा जेंव्हा डॅनीने बाहेर जायचा प्रयत्न केला तेंव्हा लोक रागाने त्याच्या अंगावर धावून जायचे. त्याला चिंकी /चिनी अशा संबोधनाने त्याचा अपमान करायचे. दगडफेक करायचे. पुण्यात घालवलेला काळ हा डॅनीच्या आयुष्यातला नरकवत काळ होता . पण एवढे अपमान होऊन पण डॅनीने कधीही या देशाबद्दल आकस बाळगला नाही. याउलट नॉर्थईस्टला देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तो सतत प्रयत्न करत राहिला. तो आणि त्याच्यासारख्या कित्येक लोकांनी सतत प्रयत्न केले तेंव्हा सरकारने २०१२ मध्ये कायदा करून नॉर्थ ईस्टच्या लोकांना चिंकी असं संबोधण्यावर बंदी आणली. हा कायदा झाल्याचा आनंद त्याला होताच पण एका साध्या गोष्टीसाठी आणि सन्मानासाठी सरकारला कायदा पास करावा लागतो याच दुःख त्या आनंदापेक्षा मोठं होत.

गंगेटोक मध्ये जन्मलेल्या डॅनीची महत्वाकांक्षा भारतीय लष्करात जाण्याची होती . पण दिलीप कुमार यांचा मोठा फॅन असणाऱ्या डॅनीला त्यांचे सिनेमे बघून अभिनयाचं आकर्षण निर्माण झालं. पुण्यातल्याच आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज मध्ये त्याला प्रवेश पण मिळाला होता. पण त्याने तिथे जाण्यापेक्षा एफ टी आय मध्ये जाण पसंद केलं. एफ टी आय मधून पास आउट झाल्यावर त्याच्या वेगळ्या चेहऱ्यामुळे त्याला रोल मिळेनात. मग त्याने पुण्यातच एफ टी आय मध्ये पार्ट टाइम नौकरी सुरु केली. आठवडाभर नौकरी करायची आणि शनिवार -रविवार कामाच्या शोधात मुंबईला जायचं. खूप टाचा घासल्यावर शेवटी गुलजार यांच्या ‘मेरे अपने ‘ मध्ये त्याला रोल मिळाला. सिनेमा हिट झाला आणि मग त्याला मागे वळून बघावे लागले नाही. नंतर त्याची नकारात्मक भूमिका असणारा ‘धुंद ‘आला आणि डॅनी बॉलिवूडमध्ये स्थिर झाला. नंतर डॅनीने अनेक मोठ्या सिनेमातून महत्वपूर्ण रोल केले. नॉर्थ ईस्ट मधून आलेल्या अभिनेत्याला उर्वरित भारतामधले प्रेक्षक स्वीकारणार नाहीत हे मिथक त्याने मोडीत काढलं. ‘शोले ‘ मधला गब्बरचा रोल पण त्याला डोक्यात ठेवून लिहिला होता असं म्हणतात.

त्याने खूप भारी सिनेमे केले असले तरी मला त्याचे तीन रोल सर्वाधिक आवडतात. ‘खोज ‘ या सिनेमातला गूढतेच वलय असलेला पाद्री , ‘चायना गेट ‘ मधला कॅन्सर पीडित असून पण शत्रूला मारता मारता मरण्याची इच्छा बाळगणारा मेजर गुरुंग आणि अर्थातच ‘घातक’ मधला ‘इसकी मौत सोचनी पडेगी ‘ म्हणारा कातिया . यातलं मेजर गुरुंगच पात्र माझ्या खऱ्या आयुष्याच्या खूप जवळच आहे स्वतः डॅनीच मत आहे . ‘घातक ‘ हा सिनेमा हृदयाच्या खूप जवळ आहे आणि त्यातली प्रत्येक गोष्ट भारी वाटते म्हणून ‘कातिया. हे तीन रोल कदाचित क्लासिक्स नसतील पण मला व्यक्तिशः सर्वाधिक आवडतात . काही गोष्टींचं स्पष्टीकरण द्यायचं नसत हेच खरं.

पण हा लेख डॅनी या अभिनेत्याबद्दल नाही . त्याने किती सिनेमे केले , कुठले सिनेमे केले हे सगळ्यांना माहित आहेच .अभिनेता म्हणून डॅनी आवडतोच पण तो ज्याप्रकारे आपल्या अटीवर आयुष्य जगतो ते पण भारी आहे .डॅनी वर्षातून एखाद दुसराच सिनेमा करतो . त्याला ऐनवेळेस शूटिंग डेट्स मधले बदल खपत नाही .त्याला कोणी रविवारी शूटिंगला ये असं सुचवलं तरी तो सिनेमा सोडून देतो . तो उन्हाळ्यात मुंबईत राहत नाही कारण त्याला उन्हाळ्यातली मुंबई आवडत नाही . उन्हाळ्यात जुहूमधला आपला बंगला सोडून तो सरळ सिक्कीम गाठतो . सिक्कीममध्ये यानं एक पन्नास एकरच जंगल विकत घेतलं आहे जिथं हजारो वर्ष जुनी झाड आहेत .वर्षातले पाच महिने तो त्या जंगलातच राहतो . त्या जंगलाला चारीबाजूने कुंपण आहे .डॅनी तिथे गेला की तिथल्या मोठ्या गेटला कुलूप लावतो आणि बाहेरच्यांची एंट्री बंद करतो . गरजेपुरता भाजीपाला डॅनी तिथेच पिकवतो .काही नौकरांसोबत तो जगापासून स्वतःला तोडून तिथे राहतो .नाही म्हणायला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आणि जनावर पण त्या जंगलात सोबतीला असतातच .डॅनीच्या या स्वतःच्या अटीवर जगण्याच्या पद्धतीचा अक्षय कुमारवर फार प्रभाव आहे .तो अनेकदा सल्ला घेण्यासाठी डॅनी कडे जातो .

डॅनीसारखेच दोन असे लोक म्हणजे नाना पाटेकर आणि मन्सूर खान . नाना पाटेकरसारखा अवलिया कलावंत डॅनीच्याच वाटेवरून चालतो आहे. सध्या नाना पुण्याजवळ एका फार्म हाउसवर शहरी गजबजाटापासून दूर एक शांत आयुष्य जगतो आहे. मन्सूर खान हा आपली दिग्दर्शक म्हणून यशस्वी कारकीर्द सोडून कुनुर या निसर्गरम्य ठिकाणी शेती करायला निघून गेला . पण नाना आणि मन्सूरमधला मुख्य फरक हा की, नाना अजूनही अभिनयात सक्रिय आहे. मात्र मन्सूरने शो बिझिनेसमधून पूर्ण निवृत्ती घेतली आहे. या दोघांनाही वेगवेगळ्या मुलाखतीमध्ये तुम्ही हा निर्णय का घेतलात, या अर्थाचे प्रश्न विचारले गेले. त्यावर नाना आणि मन्सूर यांनी त्याला दिलेली उत्तर उद‌्बोधक आहेत. नानाचं उत्तर होतं की, ‘शहरांमध्ये मला पक्ष्यांची किलबिल ऐकू येणं बंद झालं होतं.’ मन्सूरच उत्तर होतं, ‘कारण मला रात्री शांत निवांत झोपायचं होतं.’डॅनीच उत्तर असत ,”मला जगाने घालून दिलेल्या नियमांच्या चौकटीत राहण्यापेक्षा स्वतःच्या अटीवर आयुष्य जगावंसं वाटत . “डॅनीसोबतच फिल्म इंडस्ट्रीमध्ये आलेल्या लोकांचे सहाशे ते सातशे सिनेमे करून झाले . पण डॅनीने शंभरचा आकडा गाठला आहे . आकडेवारीत ज्यांना लोकांचं यश मोजायचं आहे त्यांनी खुशाल आकडेवारी करत बसावं .

डॅनीच्या समकालीन अभिनेत्यांचे मुलं -मुली सिनेमात होत असताना डॅनीच्या पोराला लाँच करायला कुणी तयार नाही .कारण त्याचे नॉर्थ ईस्ट इंडियन् लुक्स .हे दुर्दैवी आहे .म्हणजे डॅनी जेंव्हा पुण्यात आला तेंव्हा आपण एक समाज म्हणून जसे होतो अजूनही तसेच आहोत . कुछ भी तो नही बदला . डॅनी हा बुद्धिस्ट आहे . त्याचा पुनर्जन्मावर विश्वास आहे . आपण मागच्या जन्मी समुराई (जपानी योद्धा ) होतो अशी त्याची श्रद्धा आहे . ते सामुराई पण डॅनीमध्ये या जन्मी पण आलेलं दिसत . लोकांच्या मनाच्या तळागाळात जाऊन चिकटलेल्या मिथकांना लढा देऊन यशस्वी होण्यासाठी माणूस सामुराईचं हवा.

Source:- Cinderella Man

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *