‘या’ गावात देवासह लोकांनी काढला पळ, अख्ख गाव होते खाली !

धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरांचा अमूल्य ठेवा गावांनी जपलाय. बर्‍याचदा रूढी आणि परंपरांमुळे गावांचे महत्त्व कमी झाल्याची टीका होते, पण या रूढी आणि परंपरांच्या पाठीमागे असलेल्या चांगल्या कल्पना, वागणूक, संस्कृती या महत्त्वाच्या बाबी विसरता येत नाहीत. गावाला शांतता लाभावी, सुख – समाधान लाभावे ही गावकर्‍यांची इच्छा त्यांच्या कृतीतून जेव्हा स्पष्ट होते तेव्हाच त्यांच्या परंपरांना एक वेगळा साज चढतो. अशीच एक धार्मिक परंपरा म्हणजे ‘गावपळण!’

जिल्ह्यातील एक संपूर्ण गाव तीन दिवसांच्या सुट्टीवर गेलंय. या गावातून चक्क देवच पळून गेलाय. एवढंच काय गावातील गुर ढोर, माणसं देखील गाव सोडून सुट्टीवर गेली आहे. ऐकून आश्चर्य वाटेल पण या गावात दर तीन वर्षांनी तीन दिवस शुकशुकाट असतो. हे गाव आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण तालुक्यातील आचरा गाव…

श्रीरामेश्वर कृपा ज्यावरी शतधारांनी झरे,
कलासक्त हे गुणीजनमंडित पुण्यग्राम आचरे

असे यथार्थ वर्णन केलेले हे आचरे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाच्या मालवण तालुक्यात मालवणपासून फक्त २१ कि.मी.वर वसले आहे. अत्यंत वैशिष्टय़पूर्ण प्रथा जोपासणारे हे गाव अत्यंत रमणीय आहे. कोकणात अनेक देवस्थाने आहेत, परंतु देवस्थानामधले संस्थान म्हणून जे ओळखले जाते ते फक्त आचरे गावचे रामेश्वर संस्थान. आणि या संस्थानचा महाराजा म्हणजे तेथील ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर. अत्यंत रम्य आणि प्रशस्त असे प्रांगण असलेले हे मंदिर आपल्याला खिळवून ठेवते. मालवणी मुलखातील सर्वात श्रीमंत देवस्थानसुद्धा हेच आहे. सर्व आचरे गावावर या रामेश्वराची कृपादृष्टी आहे आणि सारा गाव स्वत:ला या रामेश्वराचा सेवक समजतो.

रामेश्वराची परंपरा म्हणून दर पाच वर्षांनी या गावात ‘गावपळण’ची प्रथा आजही पाळली जाते. रामेश्वराच्या कृपेने गावकऱ्यांवर कोणतंही अरिष्ट येत नाही अशी श्रद्धा आहे. शिवाय मालवण तालुक्यातील मसुरे – बिळवस गावाच्या गावपळणीत वेगळेपण आहे. संपूर्ण गाव त्यात सहभागी होतो. आजारी व्यक्ती, लहान मुलांना घरी राहण्यास मुभा आहे. पाच दिवस ही ‘गावपळण’ चालते.

कुठल्याही घरात पाच दिवस कचरा काढला जात नाही. घरातील चुलीवर जेवण बनवले जात नाही. त्यासाठी दुसरी चूल थाटतात. विशेष म्हणजे या कालावधीत घरच्या देवाची पूजा होत नाही. देवासमोर दिवा पेटत नाही. तसे बंधन आहे. रात्रीच्यावेळी गरजेपुरती वीज वापरली जाते. गावात, सुख, समाधान, शांती लाभावी हा या परंपरेमागचा उद्देश असल्याचे गावकरी सांगतात. गावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरीची पूजाही पाच दिवस बंद ठेवली जाते. बिळवसची ‘गावपळण’ म्हणजे पूर्वी मसुरे गावाचीच ही ‘गावपळण!’ वाड्यांचा पसारा वाढल्याने बिळवस गावाने ही प्रथा सुरू ठेवली.

गावपळण ही प्रथा अंदाजे तीनशे- साडेतीनशे वर्षे जुनी असल्याचे गावकरी सांगतात. अशी आख्यायिका सांगितली जाते की, कधी काळी म्हणे भुतांनी या गावात उच्छाद मांडला होता, तेव्हा लोक देव रामेश्वराला शरण गेले. देव म्हणाला की, मला गाव तीन दिवस मोकळा करून द्या, मी त्या सर्व भुतांना वठणीवर आणतो आणि तेव्हापासून दर तीन वर्षांनी सगळा गाव देवासाठी मोकळा करून दिला जातो. पण सध्याच्या तरुण पिढीला हा युक्तिवाद पटत नाही. तरीसुद्धा ते मोठय़ा हिरिरीने या उपक्रमात सहभागी झालेले असतात.

या गावात उच्चविद्याविभूषित आणि प्रतिष्ठित व्यक्तीसुद्धा मोठय़ा संख्येने आहेत. ते सांगतात की, तीन दिवस गाव मोकळा राहिल्यामुळे प्रदूषण, रोगराई अशा काही गोष्टी गावात असतील तर त्यांचा नायनाट होतो. लोक मोकळ्यावर जाऊन राहतात, तिथे त्यांना वेगळे शेजारी लाभतात. त्यातून एकी निर्माण होते. एक इव्हेंट म्हणून आता हे साजरे केले जाते. निमित्त जरी गावपळण असले तरीसुद्धा जशी शहरांत माणसे आठवडय़ाचे शेवटचे दोन दिवस बाहेर जातात, तसेच इथली प्रजा बदल म्हणून गावाबाहेर जाऊन राहते. यात अंधश्रद्धा अजिबात नाही, तर एका पुरातन परंपरेचे काटेकोरपणे जतन केलेले दिसते.

गावपळणची प्रथा मालवण तालुक्यातील वायगंणी, चिंदर, मुणगे या गावांमध्येही दिसून येते. आचऱ्यातील पारवाडी, कारवणे, देऊळवाडी बाजारपेठ, त्रिंबक पिरावाडी, जामडूल नदी, गाऊळवाडी, भंडारवाडा, हिर्लेवाडी-वायंगणी या गावातील वेशीबाहेर पडणारे काही ग्रामस्थ आपल्या नातेवाईकांकडे वास्तव्य करतात तर काहीजण मालवण भगवंत गडाच्या रस्त्यालगत राहुट्या थाटतात. तात्पुरत्या स्वरुपाच्या बांधलेल्या राहुट्या बघितल्यानंतर जणू काही वेगळं गावंच थाटल्यासारखं वाटतं. नोकरी उद्योगाच्या निमित्तानं परगावी जाणारे किंवा मुंबईला असणारी मंडळी तीन वर्षांनी येणाऱ्या या वेगळेपणाची जपणूक करण्यासाठी एकत्र येतात.

शेकडो वर्षाची परंपरा ग्रामस्थ मोठ्य़ा श्रद्धेनं जोपासत आहेत. तीन दिवस आणि तीन रात्री नंतर बारा पाचाचे मानकरी गाव भरवतात आणि रामेश्वराला कौल लावतात त्या दिवशी कौल झालाच नाही तर एक दिवस वाढवला जातो त्यानंतर पुन्हा चैथ्या दिवशी कौल दाखवला जातो रामेश्वरानं कौल दिला तर पुन्हा तोफांचा आवाज दणाणतो आणि आचरेवासीय पुन्हा आपल्या गावी परतात.

२०१४ सालच्या डिसेंबर महिन्यामध्ये ही गावपळण पाळली गेली. आता यापुढे २०१७ साली परत एकदा गावपळण होईल, परंतु तोपर्यंत हे निसर्गरम्य गाव जाऊन पाहिले पाहिजे. श्री देव रामेश्वराचे प्रशस्त मंदिर आणि आजूबाजूचा रमणीय परिसर याचे दर्शन घेतले पाहिजे. मालवणच्या अगदी जवळ असलेले हे श्रीमंत संस्थान एकदा तरी आवर्जून पाहावे असेच आहे.

केव्हा जावे? कसे जावे?

पुढील गावपळण आता २०१७ साली होणार आहे. साधारणत: दिवाळीच्या आसपास ही गावपळण होत असते. त्याकाळात आपण याचा अनुभव घेऊ शकतो. जवळच्याच चिंदर गावातदेखील गावपळण पाळली जाते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *