श्री खंड महादेव ! अमरनाथ पेक्षाही कठीण असलेली यात्रा…

आपल्याला माहिती आहे कि कैलास मान सरोवर यात्रा हि सर्वात कठीण यात्रा आहे. त्यानंतर नंबर येतो अमरनाथ यात्रेचा परंतु बऱ्याच लोकांना हे माहिती नाही श्री खंड महादेव यात्रा अमरनाथ यात्रेपेक्षाही कठीण आहे. अमरनाथ यात्रेत १४,००० फुट चढाई करावी लागते तर श्री खंड महादेव हा १८७५० फुट उंचीवर आहे. रस्ता अगदी जीवघेणा म्हणून जास्त पर्यटक किंवा भक्त इथे जात नाही. चला बघूया श्री खंड महादेवा संबधीत संपूर्ण माहिती खासरेवर

ही यात्रा दहा दिवस चालणारी आहे. या नैसगिक महाप्रचंड शिवलिंगाची पूजा पांडवांनी केली होती असेही सांगितले जाते. अतिशय खडतर अशी ही यात्रा आहे. यात्रेकरूंना पहाडावर जाण्यापूर्वी शारिरीक फिटनेसचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा साधारण ३० किमी अंतराचा ट्रेकच आहे आणि यात १८७५० फूट उंचावर शिवलिंग पूजेसाठी जावे लागते.

श्री खंड महादेव हिमाचल प्रदेश मध्ये हिमालयीन नॅशनल पार्क शेजारी आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार या शिखरावर भगवान शिव राहतात. शिवलिंगाची उंची ७२ फुट आहे. इथे पोहचण्याकरिता रस्ता हा सुंदर घाटातून जातो. अमरनाथला चढाई करताना लोक खच्चराचा उपयोग करतात परंतु हे ठिकाण एवढे कठीण आहे कि मनुष्याव्यतिरिक्त इथे कुठलाही दुसरा प्राणी जाऊ शकत नाही. श्री खंडचा रस्ता हा रामपूर बूशैहर मधून जातो. येथिल नीरमंड, त्यानंतर बागीपूल आणि शेवटी जाओ या गावातून हि पैदल यात्रा सुरु होते.

येथे महादेव श्री खंड स्वरूपात ध्यान करतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. या मागची कथा अशी सांगतात की भस्मासूर नावाच्या राक्षसाने शंकराची घोर तपश्चर्या केली. या तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या भोळ्या शंकराने भस्मासुराला वर मागण्यास सांगितले तेव्हा त्याने तो ज्या वस्तूला स्पर्श करेल ती भस्म व्हावी असा वर मागितला आणि शंकराने तो दिला. मात्र या वराने भस्मासूर ज्या त्या गोष्टीचे भस्म करू लागला व त्याला प्रचंड गर्व झाला. त्या भरात तो शंकराच्या डोक्यावर हात ठेवण्यासाठी आला तेव्हा शंकराने पलायन करून या पहाडावर आश्रय घेतला. अखेर विष्णुने मोहिनी रूप धारण करून या संकटातून सुटका केली.

विष्णुने मोहिनीचे रूप घेऊन भस्मासुराला भुरळ पाडली. मोहिनीने तिच्याबरोबरीने भस्मासूर नृत्य करेल तर त्याची कोणतीही इच्छा पूर्ण करण्याची तयारी दाखविली. भस्मासुराने त्याला मान्यता दिली तेव्हा मोहिनीने नृत्य करता करता स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला ते पाहून भस्मासुरानेही स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला व तो स्वतःच जळून भस्म झाला अशी ही कथा.

शिमला ते रामपूर १५० किमीचा प्रवास त्यानंतर रामपूर ते नीरमंड १७ किमी , नीरमंड ते बागीपूल १७ किलोमीटर, बागीपुल ते जाओं १२ किमी असा हा रस्ता आहे. श्री खंड जाताना नैसर्गिक शिव गुहा, नीरमंड मधील ७ मंदिरे, जाओ येथील पार्वती सोबत नऊ देवी, परशुराम मंदिर, दक्षिणेश्वर महादेव, हनुमान मंदिर अर्सू, सिंहगड, जोतकाली, ढंकद्वार, बकासुर बध, ढंकद्वार व कुंषा इत्यादी ठिकाणे येतात. बगीपूल पासून ७ किमी दूर जाओ गावा पर्यंत गाडीने पोहचता येते. इथून पुढे ३५ किमीचा सरळ चढाईची प्रवास सुरु होतो.

यात्रेत तीन टप्यात होते. सिंहगाड़ , थाचड़ू आणि भीम डवार असे तीन टप्पे आहेत. या दरम्यान दिसणारे दृश्य हे विलोभनीय आहे. सिंहगड हा यात्रेचा बेस कॅम्प आहे जिथे नाव नोंदणी व मेडिकल चेकप करून यात्रेकरिता परवानगी मिळते.

श्री खंड महादेव यात्रा मार्गावर यंदा प्रचंड बर्फवृष्टी होत असल्याने ही यात्रा अधिक खडतर बनली आहे. ३५ किलोमीटर्स चा शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस लावणारा, खडतर ट्रेक करून १८७५० फूट उंचीवर पोचून श्री खंड महादेवाच्या या ७२ फुटी शिवलिंगाचे दर्शन होते. शिखराजवळून पार्वती नदीचे खोरे, किनर कैलास, जोरकन्दन, रंगरिक आणि इतर हिमालयीन शिखरांचे नजरबंदी करणारे दृश्य दिसते.

हिमाचल मधल्या कुलू जिल्ह्यात असणाऱ्या श्री खंड महादेवाची यात्रा दर वर्षी जुलै – ऑगस्ट च्या दरम्यान संपन्न होते. या वर्षी हि यात्रा १५ जुलै ते ३१ जुलै दरम्यान संपन्न झाली. संपूर्ण यात्रेसाठी ७ ते १० दिवस लागतात. यात्रेदरम्यान गेल्यास हिमाचल सरकार कडून प्रत्येक टप्प्यावर टेन्ट्स मध्ये राहण्याची सोय आणि अन्नछत्र उपलब्ध असते.

यात्रेदरम्याण दिसणारे ब्रम्हकमळ..

१५००० फुटांवर फार कमी शिखरे जगात अशी आहेत कि जिथे इतक्या उंचीवर जाण्यासाठी कोणतेही ट्रेकिंग गियर लागत नाही, १७१५० फूट उंचीवर असलेले श्री खंड महादेव त्यापैकीच एक आहे. या संपूर्ण मोहिमेचा विडीओ तुम्ही खाली बघू शकता…

जर आपण साहसी ट्रेकर आहात तर करा पुढील वर्षी श्री खंड महादेवाच्या चढाईची तयारी…
लेख आवडल्यास अवश्य शेअर करा व आपले लेख तुम्ही आम्हाला info@khaasre.com या पत्त्यावर पाठवू शकता…
वाचा पद्मनाभम स्वामी मंदिरातील खजिन्याचे रहस्य…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *