एका गाईपासून ३० एकर शेती करणारे पद्मश्री सुभाष पाळेकर…

“झिरो बजेट शेती” हे नाव आज सर्वत्र प्रसिध्द झालेले आहे. देशातच काय विदेशातही ह्या शेतीची माहिती घेण्याकरिता लोक भारतात येत आहेत किंवा पुस्तके वाचत आहे. ह्याच झिरो बजेट शेतीचा जनक पद्मश्री सुभाष पाळेकर हे आहेत. भारतीय कृषी क्षेत्रात झिरो बजेट शेतीची शेतीची क्रांतिकारी संकल्पना मांडली. नुसती संकल्पना मांडलीच नाही, तर आपल्या शेतीत ती संकल्पाना प्रत्यक्षात आणली. चला ह्या अवलिया बद्दल खासरेवर माहिती बघूया…

‘झिरो बजेट शेती’ म्हणजे नक्की काय आहे?

कुठल्याही धंद्याचे यश हे नियोजन व त्यावर होणारा खर्च म्हणजेच बजेट वर अवलंबून आहे. बजेट योग्य नसेल तर सगळा व्यवसाय डबघाईस येतो. विदर्भात एक म्हण आहे “चार आण्याची कोंबडी व बारा आण्याचा मसाला” असे सध्या सर्व देशातील शेतीत होत आहे. खर्चा पेक्षा उत्पन्न कमी होत आहे. शेतकऱ्याची परिस्थीती सुधारण्यासाठी सुभाष पाळेकर यांनी झिरो बजेट शेतीचा पर्याय शोधून काढला आहे.

अमरावती जिल्ह्यात बेलोरा या खेड्यात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पाळेकरांनी शेतीतच भविष्य करायचे ठरवले होते. त्यामुळे त्यांनी कृषी विषयाची पदवीही घेतली. १९७२ ते १९८२ रासायनिक शेती केली. सुरुवातीची तीन वर्ष चांगले उत्पादन मिळाले पण नंतर उत्पादनाचा आलेख खाली तर खर्चाचा वर जाऊ लागला. यावर त्यांनी माहिती मिळवायला सुरवात केली, अनेक कृषी तज्ञांना भेटले परंतु त्यांना कुठेच समाधानकारक उत्तर भेटत नव्हते. म्हणून आपणच याचे उत्तर शोधायचे त्यांनी ठरवले आणि सुरु झाला झिरो बजेट शेतीचा शोध.

झिरो बजेट शेतीची चारसुत्री आहे ती म्हणजे बीजामृत, जीवामृत, आच्छादन आणि वाफसा हे महत्वाचे सूत्र आहे. नैसर्गिक शेतीचे पाळेकर तंत्र हेच आहे. शेतीतल्या संसाधनांचा शेतीसाठी वापर, हे त्यांच्या तंत्राच मूळ आहे.

काय आहे बिजामृत ?

बीजामृताचा वापर बियाण्यावर जमिनीतून येणाऱ्या कीड- रोग नियंत्रणासाठी केला जातो. देशी गाईचे शेण, गोमूत्र, चुना किवा चुनखडीचा वापर करुन हे बीजामृत तयार करतात.

त्यानंतर येणारे जीवामृत..

पिकांच्या वाढीसाठी जीवामृत महत्त्वाचे असल्याचे पाळेकर यांनी सांगितले. गाईचे शेण, गोमूत्र आणि गूळाचा वापर करुन जीवामृत तयार केले जाते.

झिरो बजेट शेती तंत्राचे तिसरे सूत्र म्हणजे आच्छादन

पाण्याचा प्रश्न दिवसान दिवस कठीण होत आहे त्यामुळे आच्छादन या बाबीचा पाळेकरयांनी शोध घेतला. आच्छादनामुळे ओलावा जास्त काळ टिकून राहतो, ९० टक्के पाण्याची बचत होते तसेच जमिनीत गांडूळांची संख्या वाढून जमिन सुपीक होण्यास मदत होते.

सर्वात महत्वाचा भाग म्हणजे वाफसा

बीजामृत, जीवामृत आणि आच्छादन याचा फायदा होण्यासाठी जमिनीत वाफसा असणे गरजेचे आहे.

ज्याला आज पाळेकर तंत्र म्हणून ओळखतो ते सुभाष पाळेकरांनी सुरुवातीला आपल्या शेतीत १९८८ ते १९९५ पर्यंत हा प्रयोग स्वतःच्या शेतीत करून पहिला, त्यांच्या शेतातील एका गायीपासून त्यांनी ३० एकर शेती केली. त्याचे चांगले परिणाम दिसून आल्यावरच त्यांनी त्याचा देशभर प्रसार सुरु केला. स्वतः प्रयोग केल्यामुळे त्यांना ह्या विषयावर संपूर्ण माहिती आहे.

पुस्तक, व्याख्याने आणि शिबिराच्या माध्यमातून त्यांनी या झिरो बजेट शेतीचा प्रसार ते करतात. आज देश-विदेशात या तंत्राचा वापर केला जातो. देशात ४० लाख शेतकरी झिरो बजेट शेती करतात असे ते सांगतात. तसेच त्यांनी अधुन्निक तंत्रज्ञानाची कास धरून त्यांची वेबसाईट palekarzerobudgetspiritualfarming यावर त्यांच्या शेती संबंधित संपूर्ण माहिती दिली आहे. ते सांगतात कि या वेबसाईटचा वापर करून अमेरिका, आफ्रिका या देशातही काही शेतकरी या तंत्राचा उपयोग करत आहे.

रासायनिक शेतीचे दुष्परिणाम शेतकरी तसेच कृषी-शास्त्रज्ञांच्याही लक्षात आले आहेत. त्यामुळे केंद्रीय स्तरावरूनच सेंद्रीय शेतीला पाठबळ दिले जात आहे. मात्र त्याचे चांगले परिणाम दिसायला बराच काळ जाऊ शकतो. अशावेळी झिरो बजेट शेतीतून फायदा मिळवणारे ४० लाख शेतकरी या तंत्राचा यश दाखवून देत आहेत.

कर्नाटक,आंध्रप्रदेश,केरळ या राज्यात झिरो बजेट शेती करणारे जास्त शेतकरी आहेत. ज्या महाराष्ट्रात या झिरो बजेट शेतीचा जन्म झाला त्याच राज्यात पाळेकर तंत्र काहीसे उपेक्षित राहिले याची थोडीसी खंत पाळेकरांना वाटते. अर्थात यात पाळेकरांइतकाच तोटा इथल्या छोट्या कोरडवाहू शेतकऱ्याचाही झालाय यात शंका नाही.

Cell – 09423601004, 09673162240, 09850352745
खासरे तर्फे सुभाष पाळेकर यांच्या कार्यास मानाचा मुजरा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *