गवंडी काम करणाऱ्या सुनिता गायकवाड यांची यशोगाथा…

टाकवे बुद्रुक : महिला कुठल्याही क्षेत्रात मागे नाही हे आज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून आणि आपल्या चांगल्या कामाचा ठसा उमटवून त्या सिद्ध करत आहे. घरात अठरा विश्व दारिद्र्य दोन वेळ खाण्याचेही वांदे , खायला पावसाळ्यात शेताच्या बांधावरची कुर्डूची भाजी, आणि खेकडे पकडून दिवस निघायचे, परंतु आता परिस्थिती अगदी बदललेली आहे. घरासमोर चारचाकी वाहन आले हे सर्व शक्य झाले ते हातात थापी, ओळंबा आणि रंधा घेऊन गवंडी काम करणाऱ्या सुनिता सुरेश गायकवाड यांच्या मुळे

Sunita Gaikwad

आपल्या यशाचे श्रेय ती आई एकवीरा देवीला देते तिच्यामुळेच हे बळ आले आहे अशी ती सांगते. त्यामुळेच तिच्या अखंड भक्ती पोटी ती नवरात्रात निराकार उपवास धरते. तिच्या वर माझी निस्सीम भक्ती व श्रद्धा आहे. म्हणूनच मी लढत राहिले, कष्ट करीत राहिले. त्या आईचीच आमच्या वर कृपा आहे. तिच्या भागात अनेकांना निवारा बांधून, शौचालय बांधून देण्यात तिचा हात कोणीही पकडू शकत नाही, कामाचा वेग तर असा कि एखादा पुरुष हि लाजेल. मुळच्या साई गावातील छगन जाधव व सुमन जाधव यांची थोरली लेक सुनिता ताई, त्याच्या पाठोपाठ या दाम्पत्यास ४ मुली झाल्या,मुलगा नाही अशी सुरूवातीला आई वडीलांना खंत वाटायची आणि दुष्काळात तेरावा महिना वडिलांना व्यसन जुळले. ते व्यसनाच्या आहारी गेले.

या सर्व परिस्थतीमुळे सुनीताला ५वी पर्यंत शिक्षण घेता आले. त्यानंतर तिच्या मामाकडे दहिवली येथे तिला वयाच्या ११व्या वर्षापासून रोजंदारीवर जावे लागले.
वयाच्या १४ व्या वर्षी तिचे लग्न झाले आणि जाधवांची हि कन्या गायकवाड घरात लक्ष्मी म्हणून गेली. परंतु हा आनंद फार काळ टिकला नाही कुटुंबाच्या वाटण्या झाल्या आणि त्याच यातना पुन्हा पदरी पडल्या.

घरात परत अठरा विश्व दारिद्र्य कोणी पाहुणा आला तर घरात चहा करायला सुध्दा चहा पत्ती राहत नव्हती. परिस्थितीशी झगडत दोघेही चालू लागले. घरात मूठभर धान्य नाही, की आमटीला कडधान्य नाही. पावसाळयात खेकडे गिरवून त्यांची दोन वेळेला पुरले इतके कालवण करायचे, कधी कुर्डूची भाजी तर कधी माठाची भाजी खायची.

त्यानंतर दोघाही पती पत्नींनी काम करायला सुरवात केली. त्यांना लक्षात आले जर सोबत काम केले तरच टिकू नाहीतर आयुष्य काढणे कठीण आहे. नवरा बायको सुरूवातीला गवंडयाच्या हाताखाली रोजंदारीने काम करायला सुरवात केली, मनात ठाम ठरविले होते कि हे सर्व बदलले पाहिजे. घरात पोटापुरत खायला आल पाहिजे. अप्प्ल्याला प्रगती करायची आहे आयुष्यात पुढे जायचे आहे.

काम करताना सुनिता शिकण्याचा प्रयत्न करू लागली. एकनाथ नाणेकर हा तिचा या क्षेत्रात गुरु त्याने सुनीताची धडपड ओळखली आणि तिला योग्य मार्गदर्शन करायला सुरवात केली. सुरूवातीला वीटाचे बांधकाम,त्यानंतर त्यावर प्लास्टर, मग दगड काम शिकण्यास त्या रस घेऊ लागल्या, प्लास्टर करताना वाळू सिंमेटने भरलेली थापी सरळ मारता आली, पण हीच थापी उलटी मारता नाय आली, त्यावेळी त्यांनी हातांनी सिमेंट लावून भिंतीची गोठाई केली. अनेक कष्ट उपासत या कामात त्या आता तरबेज झाल्या आहेत.

आज एखाद्या पुरुषापेक्षाही ती चांगल्या प्रकारे काम करते. आणि तिच्या कामाची पावती हि तिचे गावकरी देतातच. या कामात अजून तरबेज होण्याकरिता तिने विशेष प्रशिक्षण हि घेतले. तिच्या कामात ती नफा कमी ठेवते त्यामुळे कामाची तिला कमी नाही आहे.

शासनाच्या निर्मलग्राम योजनेसाठी त्यांनी पंचक्रोशीतील महिलांसाठी घराघरो माफक मजूरीत शौचालय बांधून दिली. त्याचा लाभ माझ्या मायमाऊल्यांना झाला, म्हणून या कामातील आवड अधिक वाढत गेली. वर्षाकाठी अडीच ते तीन लाखाचे उत्पन्न मिळाल्याने दूध व्यवसाय, पिठाची गिरणी सारखे व्यवसाय वाढवता आले. अडीच एकरात ऊस लावून तो संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याला जातो, हे त्या अभिमानाने सांगत आहेत. या सर्व कामात पतीराजांचे मोठे सहकार्य मिळत आहे. समीर पदवीचे शिक्षण घेत आहे तर काजल १० वीत शिकलेली दोन अपत्यांची माय मोठ्या स्वाभिमानाने जगत आहे. तिच्या लेकाने पुढे याच व्यवसायात करिअर करावे अशी तिची इच्छा आहे.

खेडया पाडयातील तरूण बांधकाम क्षेत्रात नगण्य आहे, ती उणीव त्याने भरून काढली पाहिजे. स्वतःचा प्रपंच सावरणा-या सुनिता गायकवाड इतरांसाठी धावत पळत आहेत. जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेच्या मदतीने त्या खेडयापाडयातील महिलांनी व्यवसायात उतरावे असा आग्रह धरीत आहे. त्यामुळे फावल्या वेळात महिलांना पनीर व साबण बनविण्याचे त्या प्रशिक्षण देत आहे.खेडया पाडयात हक्काचा निवारा आणि शौचालय बांधून देण्याच्या कामात रोजगारही मिळाला आणि पुण्य प्राप्त झाले, म्हणूनच आज घरात सुखाचे चार दिवस दिसत आहे, याचे मोठे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

सुनिता गायकवाडचे आई वडील एका काळात मुलगा हवा म्हणून दुखी होते तेच आज तिचे अभिमानाने नाव घेतात. म्हणतात कि “आम्हाला आता मुलगा नाही याची खंत नाही कारण लेकीने आमचे नवाव उजळले आहे. आमची लेक हि लेका पेक्षाही सरस निघाली त्यामुळे आम्हाला अभिमान वाटतो.”

वाचा उच्चपदस्थ सरकारी नोकरी सोडून अनेक अनाथ, गरीब, मनोरुग्णांसाठी कार्य करणारी ‘द रियल हिरो’

हि यशोगाथा आवडल्यास नक्की शेअर करा..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *