देवीची महाराष्ट्रातील साडे तीन शक्तिपीठे..

नवरात्रोत्सवाला आता प्रारंभ होत असून प्राचीन काळापासून शक्‍तीच्या उपासनेला खूप महत्त्व दिले गेले आहे.शक्तीची उपासना माणसाला नेहमीच प्रेरणादायी ठरते. महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्ती पीठे आहेत. तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका ही तीन पूर्ण तर वणीची सप्तशृंगी हे अर्धे शक्‍तिपीठ मानले जाते.

पहिले शक्तीपीठ- अंबादेवी माता (कोल्हापूर)

कोल्हापूरचे अंबाबाईचे देऊळ हे पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक, व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्यांच्या काळात इ.स. ६०० ते ७०० मध्ये बांधले असण्याची शक्यता आहे. मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्या आधीचा शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे. पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खर्‍या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते.

अंबाबाईची मूर्ती १.२२ मीटर उंच असून ती एका ०.९१ मीटर उंच असलेल्या दगडी चौथर्‍यावर उभी करण्यात आलेली आहे. कार्तिक आणि माघ महिन्यात अंबाबाईच्या देवळाच्याबाबत एक अतिशय विलक्षण घटना अनुभवास येते. विशिष्ट दिवशी सूर्यकिरणे महाद्वारातून प्रवेश करून गाभार्‍यापर्यंत पोहोचतात आणि तेथून ती अंबाबाईच्या प्रतिमेवर परावर्तित होतात. ही किरणे पहिल्या प्रथम अंबाबाईच्या पायावर पोहोचतात व तेथून ती हळूहळू मस्तकापर्यंत पोहोचतात. हा चमत्कार सोहळा पाच मिनिटांपर्यंत चालतो. हा सोहळा पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. देवळाची बांधणीच अशा पद्धतीने करण्यात आलेली आहे की, वर्षातून केवळ दोन दिवशीच सूर्यकिरणे देवीच्या अंगावर पडतात.

एका कथेनुसार करवीर क्षेत्रातील कोल्हासुर नावाचा दैत्यराजा प्रजेला आणि देवांना पुष्कळ त्रास देत असे. अंबाबाईने त्याचा वध केला. कोल्हासुराच्या अंतिम समयीच्या विनंतीनुसार या क्षेत्राचे नाव ‘कोल्हापूर’ आणि याच ठिकाणी वास्तव्य करण्याचे अंबाबाईने मान्य केले.

दुसरे पीठ- श्री रेणुकामाता (माहूरगड)

महाराष्ट्रातील प्रमुख शक्तिदेवतांपैकी माहूरची रेणुकादेवी एक. साडेतीन शक्तिपीठांपैकी हे तिसरे पूर्ण शक्तिपीठ आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्‍यात माहूरगडासमोर हे ठिकाण आहे. रेणुकादेवीचे फक्त शिर दिसते, धड नाही. रेणुका ही जमदग्नी ऋषींची पत्नी व महापराक्रमी परशुरामाची आई. रेणुकेचे मंदिर लहानसे असून प्रवेशाचा दरवाजा दक्षिणाभिमुख आहे. दरवाजावर नगारखाना आहे. देवीला खलबत्त्यात पान कुटून नैवेद्य दाखवितात. नवरात्रीत येथे नऊ दिवस मोठ्या प्रमाणात धार्मिक उत्सव साजरा केला जातो. यासाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येने येतात. नवरात्रीच्या काळात आणि एरव्हीही दागिन्यांनी नटलेली असते. तेथे रेल्वेने जाणे सर्वाधिक सोईचे आहे. रेल्वेने जाताना किनवट स्थानकावर उतरावे लागते. तेथून ५५ किलोमीटर अंतरावर माहूर आहे. रेणुका देवीला अनेक ठिकाणी विशेषतः कर्नाटकात यल्लमा नावानेही ओळखले जाते.

परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला ‘मातापूर’ म्हणू लागले. शेजारच्या आंध्रप्रदेशात ‘ऊर’ म्हणजे गाव ते ‘ माऊर ‘ आणि पुढे ‘ माहूर ‘ झाले.

तिसरे पीठ- श्री तुळजाभवानी माता (श्रीक्षेत्र तुळजापूर)

कोल्हापूरच्या अंबाबाईपाठोपाठ नाव घेतले जाते ते तुळजापूरच्या तुळजाभवानीचे. तुळजाभवानीला महाराष्ट्राची कुलस्वामिनीही म्हटले जाते. तुळजाभवानी ही भोसले घराण्याची कुलदेवी. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुळजाभवानीचे दर्शन घेऊनच अनेक मोहिमा फत्ते केल्याची इतिहासात नोंद आहे. तुळजापुरात नवरात्रीबरोबरच चैत्र महिना, ललित पंचमी, मकर संक्रांती आणि रथ सप्तमीला येथे खास धार्मिक उत्सव असतो. त्यासाठी देशभरातून भाविक येथे येत असतात.

तुळजाभवानी मंदिरात अमृतकुंड आहे. अमृतकुंडात स्नान करूनच भाविक दर्शनासाठी जातात. तुळजाभवानी मंदिराचे अस्तित्व बाराव्या शतकापासून असल्याचे बोलले जाते. मंदिराचे बांधकाम पूर्णपणे दगडामध्ये केलेले आहे. दरवर्षी भाद्रपद वद्य अष्टमीला देवीची मुख्य मूर्ती सिंहासनावरून हलविली जाते. त्यानंतर नवरात्रीच्या प्रारंभी ती सिंहासनावर येते.

भारतातील शक्तिदेवताच्या पीठापैकी साडे तीन पीठे महाराष्ट्रात आहे. त्यातील श्री क्षेत्र तुळजापूर हे पूर्ण व आद्यपीठ मानले जाते. महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेले तुळजापूर हे महत्वाचे तीर्थक्षेत्र असून त्याठिकाणी तुळजाभवानी देवीचे प्राचीन मंदिर आहे. तुळजाभवानी देवीची महती तशी हिंदू पुराणातून खूपच विस्ताराने सांगितली गेली आहे. त्या माहितीनुसार असुरांचा, दैत्यांचा संहार करून विश्वात नीती व धर्माचरण यांची पुनर्स्थापना करण्याचे महत्त्वाचे कार्य तुळजाभवानी देवीने प्रत्येक युगामध्ये केले आहे.

हे स्थान उस्मानाबाद जिल्ह्यात असून उस्मानाबाद व सोलापूर ही जवळची रेल्वे स्थानके आहेत. उस्मानाबाद – तुळजापूर अंतर १९ कि.मी. आहे. सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, जळगाव, मुंबई, पुणे, कोल्हापूर या ठिकाणांहून तुळजापूरला थेट बसची सोय आहे.

वणीचे अर्ध शक्तीपीठ- ‘सप्तशृंगीदेवी’ (सप्तश्रृंगगड,वणी)

साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे पीठ असणारी सप्तशृंगीदेवी नाशिक जिल्ह्यातील वणी येथील पर्वतामध्ये आहे. या पर्वतामध्ये सात शिखरे आहेत. यापैकी एका सप्तशृंगस्थळी वास्तव्य करणारी सप्तशृंगीदेवी. मूर्ती दहा फूट उंचीची आहे. मूर्तीला दहा हात आहेत. प्रत्येक हातात एक शस्त्र आहे. मूर्तीला शेंदूर फासण्याची प्रथा येथे आहे. ही स्वयंभू आहे. महिषासुरमर्दिनी असेही तिला म्हटले जाते. डोंगर चढून देवीच्या दर्शनासाठी पायऱ्या आहेत. डोंगरातून वाट काढून या पायऱ्या तयार केल्या आहेत. दर्शनासाठी ५०० पायऱ्या चढून वर जावे लागते. आता थेट शिखरापर्यंत मोटारीही जाऊ लागल्या आहेत. प्राचीन काळी मार्कंडेय ऋषींचा आश्रम याच ठिकाणी होता. त्यांनी आदिशक्तीचे तप करून तिला प्रसन्न करून घेतले व तिला या डोंगरावर वास्तव्य करण्याची विनंती केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे येथील एका डोंगराचे नामकरण मार्कंडेय

देवीची मूर्ती ८ फूट उंचीची असून शेंदूराने लेपलेली आहे. कर्णफुले, नथ, मंगळसुत्र, कमरपट्टा, तोडे परिधान केलेली ही सप्तशृंगी देवी भक्ताच्या हाकेला धावून जाणारी आहे.सप्तशृंगीदेवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओंकाररूप समजण्यात येते. शुंभनिशुंभ व महिषासुर या पाशवी शक्तीच्या असुरांचा नाश केल्यावर तप-साधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केले. सह्याद्रीच्या या उंच कड्यास सात शिखरे आहेत. त्यावरून या स्थानाचे नावसप्तशृंगगड पडले. हे देवीचे मूळ पीठ मानले जाते. सुमारे पाचशे पायर्‍या, देऊळ, सभागृह, दर्शनाच्या रांगेची जागा असे सर्व बांधकाम येथे नव्याने केले आहे. देवीची मूर्ती अतिभव्य असून अठरा हातांची आहे. या ठिकाणी नवरात्रात तसेच चैत्र महिन्यात यात्रा भरते.

साडेतीन शक्तिपीठांची दंतकथा
पूर्वी दक्षाने बृहस्पतीराव या नावाचा मोठा यज्ञ केला. या यज्ञात शंकराला न बोलावता सर्व देवांना बोलावले. शिवपत्नी सती या यज्ञाला आमंत्रण नसताना गेली. यज्ञात शिवाला हबीरभाग दिला गेला नाही, त्यामुळे सतीने रागाने यज्ञात उडी घेतली. शंकराला हे कळल्यानंतर त्याने यज्ञाचा विध्वंस केला. सतीचे कलेवर (देह) हातात घेऊन श्री शंकर त्रैलोक्यात हिंडू लागले. ही स्थिती पाहून विष्णूने सुदर्शन चक‘ सोडले व सतीच्या शरीराचे ५१ तुकडे ठिकठिकाणी पाडले. हे तुकडे ज्या ठिकाणी पडले, हीच ५१ शक्तिपीठे म्हणून गणली जाऊ लागली.

यांपैकी महाराष्ट्रात शक्तीची साडेतीन पीठे आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची महासरस्वती (भवानी माता), माहुरची महाकाली आणि वणीची सप्तशृंगी देवी ही ती पीठे होत.

संकलित

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *