समशानात सोने घडविणारा शिक्षक…. अवश्य वाचा

१२ डिसेंबर २००१ मि एक मराठवाड्यातील सामान्य युवक विदर्भातील मातीत पहिल्यांदा आला. व्यावसायिक आयुष्यात पहिल्यांदा प्रवेश केला २१ डिसेंबर २००१ यवतमाळ जिल्ह्य़ातील महागाव तालुक्यातील करंजखेड (जुने) येथील जिल्हा परीषद शाळेवर मला पदस्थापना मिळाली.

सकाळी १० वाजता महागावच्या बसस्थानकावर करंजखेड जाण्याकरीता विचारपुस केली समजले कि गावात बससेवा नाही. जायचे असेल तर खाजगी ऑटो बघाव लागेल. शहरी आयुष्यात वागलेला मी मामाच्या गावा व्यतिरिक्त खेडेगावातला कुठलाही अनुभव नव्हता.

करंजखेडमध्ये गेल्यावर समजले की दोन गावे आहेत. नविन गावात मुख्य शाळा आहे. तिथे गेलो मुख्याध्यापक धुळे सर यांना माझी ओळख दिली व नौकरीवर रुजू झालो. त्यांनी माझ्या हातात एक किल्ल्याचा गुच्छ दिला व सांगितले ही घे तुझ्या शाळेची चाबी व जुन्या गावात १ ते ४ वर्ग शिकवण्याचे काम दिले. सहकारी शिक्षक म्हणून गावातील एक ७व्या वर्गातील विद्यार्थी मंगेश ठाकरे हा होता. करंजखेड जुने गाव हे नविन गावापासून २ किमी दुर जायला रस्ता नव्हता कच्ची पायवाट चालत चालत गावात पोहचलो.

गावाच्या मधात जुनाट दोन टिनाच्या खोल्या होत्या बाहेर जवळपास ५० ते ६० मुले उभे होती. नविन शिक्षकाची वाट पाहत हे विद्यार्थी उभे होते. माझ्या सोबत आलेल्या विद्यार्थ्यांने त्यांना सांगितले की हे आपले नविन सर, मुले भोवताल गोळा झाले व नाव गाव विचारु लागले. गावातुन जाताना प्रत्यक जन मुलांना विचारत कोन आहे हा मुलगा कारण ही तसेच होते. माझी सडपातळ शरीरयष्टी, वय वर्ष २०, बेल बॉटमचा पैन्ट लोकांना मि नविन शिक्षक असल्याचे सांगितल्यावर आश्चर्यचकित होत होते. कसाबसा तो दिवस संपला महागावला परत येण्याकरीता नविन गावात पैदल आलो. तिथे आल्यावर कळले परत जाण्याकरीता वाहन नाही. ९ किमी पैदल चालत सायं ७ वाजता महागाव गाठले.

मनात ठरवले कि नको ही नौकरी, नांदेडला परत जायचे काहीतरी करु दुसर असे अनेक विचार मनात काहुर माजवत होते. वडिलांना फोन केला संपूर्ण दिवसभराची आपबिती त्यांना सांगितली तर वडिल बोलले “बघ नौकरी करायची म्हटल तर खेड्यातच करावी लागेल, काही दिवस राह एकवेळ लोकासोबत ओळख झाल्यास मन रमेल आपोआप” बाबाच्या शब्दाकरीता एक नविन सायकल घेतली व करंजखेड जुने शाळेच्या प्रवासाला सुरवात झाली.

ज्या गावात मी एक दिवसानंतर पुन्हा जायच नाही असा विचार घेऊन निघालो होते आज मला त्याच गावात १६ वर्ष पुर्ण झाली आहेत. आज हे लिहतना मलाही विश्वास बसत नाही. विद्यार्थी, शिक्षक व गावकरी यांचे प्रेम व सहकार्यामुळे हे शक्य झाले. दोन खोल्याची शाळा ते आज १ ते ८ वर्ग असलेली स्वतंत्र शाळा, सद्या माझी शाळा जिल्ह्य़ातील पहिल्य क्रमांकाची शाळा, डिजीटल शाळा, संगणक कक्ष, हरीत शाळा, सप्ततारांकीत शाळा, गुणवत्तापूर्ण शाळा, तंबाकुमुक्त शाळा ईत्यादी पुरस्काराने सन्मानित शाळा आहे. सोबतच शाळेत समाजोपयोगी कार्यक्रम घेतले जातात रक्तदान शिबीर, रोगनिदान शिबीर, महिला शिबीर ईत्यादी हे सर्व १६ वर्षात घडल. हे सर्व लिहताना संपुर्ण प्रवास माझ्या डोळ्यासमोरून जातो. हे सर्व लिहण्याचा थोडक्यात प्रयत्न करतो.

२००५ पासुन ह्या प्रवासाल बळ आले. मि अचानक ठरविले मला रोज नविन गावात पैदल जाण्याकरीता एवढा त्रास होतो तर विद्यार्थ्यांना किती होत असेल? उच्च प्राथमिक शिक्षण गावात सुरू करायचे ठरविले. आ वासून पुढे असलेला प्रश्न वर्गखोली एवढे विद्यार्थी बसणार कोठे? आधिच २ वर्गात मि ८० ते ९० विद्यार्थी घेऊन बसायचो सोबत सहकरी शिक्षक ही होता. शिक्षक व मुख्याध्यापक असा दुहेरी भार वाहत २००६ ला ५वा वर्ग सुरू केला. कार्यालयातुन नविन वर्गखोली हि मंजुर झाली. सर्वात मोठा प्रश्न आता नविन वर्गखोली बांधायची कुठे?

ह्या वर्गखोलीची कथा हि भयंकरच, गावात शाळेची ई वर्ग जमिन होती लोक त्या जमिनीस “गालागुडी” म्हनत होते. ह्या जमिनीचा प्रस्ताव गावासमोर मांडल्यास गावातून प्रखर विरोध सुरू झाला कारण हि जुनी स्मशानभूमी होती. ईथे विद्यार्थी आम्ही पाठविणार नाही असे पालक बोलु लागले. सर्वाची समजुत काढली दुसरी जागा गावात उपलब्ध नव्हती व नविन वर्गखोलीचे बांधकाम झाले. १५ ऑगस्ट २००८ ला नविन वर्गात ५ वी ते ७वे पर्यतचे विद्यार्थी जाण्याचे ठरविले. गावात गालागुडीत झालेल्या घटनाचे लोकात चर्चा सुरू झाल्या काही पालक आजही विरोधात होते. त्याचीही चुक नव्हती बांधकामाच्या वेळेस खोदकाम करताना आम्हाला हाडे लागायची काहीतर संपुर्ण मानवी सांगडे निघाली. मला चुकल्या सारखे वाटत होते. परंतु घेतलेला निर्णय आता माघार घेता येत नव्हती.

१५ ऑगस्टला शाळा सुरु करण्याचे ठरविले परंतु १० तारखेला होत्याचे नव्हते झाले वर्ग ५ ते ७ व्हे सर्व विद्यार्थी घेऊन सुरवसे सर नवीन शाळेत गेले सोबत नाईक सर होते व अचानक एक मुलगा पळत आला आणि म्हणाला सर देवाला भूतान धरल , मी घाबरलो व सरळ त्या ठिकाणी गेलो दोन्ही शाळेचे अंतर १० मिनटाचे जाऊन पाहतो तर काय देवानंद विजय तालंगकर या मुलाची मान वाकडी झालेली होती आणि तो झटके देत होता सुरवसे सर त्याला धीर देत होते. त्याला मी लगेच गाडीवर बसवून डॉक्टर कडे घेऊन गेलो आणि एकद गावात संपूर्ण जमाव शाळेत जमा झाला आणि मी घेतलेल्या निर्णयाचा हा परिणाम ते बोलू लागले.

शाळा मसणात भरवली आणि लेकराची माती केली अशे लोक बोलत होते. त्याला फिटची बिमारी होती हे नंतर आम्हाला कळले. परंतु जमाव मला बोलत होता मी तो प्रसंग कसातरी हाताळला. आणि १५ ऑगस्ट २००८ ला या स्मशानभूमीत राष्ट्रध्वज फडकला.

त्यानंतर मी या शाळेत काही धार्मिक कार्यक्रम घेतले. गणपती,दुर्गादेवी,नवरात्र आणि गावातील लोकांना महाप्रसाद ठेवला आणि एक दिवस अचानक घोषित केले कि आता या जागेची शांतता झाली आहे. इथे कुठलेही भूतप्रेत नाही. आणि १ ते ७ पर्यंत पूर्ण शाळा इथे भरणे सुरु झाली. गावकरी महिलांनी या गोष्टीस मला अधिक पाठबळ दिले आणि माझी हि युक्ती कामी आली. त्यानंतर बरेच दिवस शाळेत खिचडी होत नव्हती ती वेगळ्या जागेवर शिजवल्या जात होती. या कार्यक्रमात महाप्रसादानंतर इथे खिचडी बननेही सुरु झाले. आजही अंगावर काटा उभा राहतो हे सर्व गोष्ठी आठवून….\

हे सर्व करत असताना गुणवत्ता हि एक नंबर वर राहिली आहे. शाळेत दरवर्षी नवीन उपक्रम राबविले जातात. समाजपयोगी कार्यक्रम आयोजित केले जातात.रक्तदान शिबीरतर आमचे फार तालुक्यात गाजले होते जवळपास १५९ लोकांनी खेड्यात रक्तदान केले होते. यात २६ महिलांचा समावेश होता.

लोक सहभागातून शाळेचा ओटा, कमान,लोखंडी गेट, वृक्ष किमान ४० ते ५० हजार लोक वर्गणी जमा करून आज सुसज्ज शाळा बनली आहे. प्रत्येक वर्गात बेंच,लाईट,फैन,संगणक,खेळण्याचे साहित्य,मोठे मैदान,बगीचा आज सर्वकाही इथे उपलब्ध आहे. आज यवतमाळ जिल्ह्यात हि शाळा नावाजली आहे. स्मशानात सोन घडवायची हि अविस्मरणीय १६ वर्ष…

गजानन नांदेडकर
७७७६९७९९०९,८३२९५०२३६३