राजा नागडा आहे!!!

8 नोव्हेंबर 2016ला महान प्रधानसेवकांनी RBI आणि वित्तमंत्री यांच्याकडून फक्त “मम्” म्हणवून स्वतःच्या अपार शहाणपणाच्या गर्वात 500 व 1000 च्या नोटा रद्दबातल ठरवल्या. एकूण अर्थव्यवस्थेत असणारे 86% मूल्याचे चलन अचानक निष्प्रभ केले. त्या रात्री मोदींनी दिलेले भाषण कुणी ऐकले तर त्यात ते या नोटबंदीची चार प्रमुख कारणे सांगतात ती म्हणजे भ्रष्टाचार, काळे धन, नकली नोटा आणि आतंकवाद.

दुसऱ्याच दिवशी या देशात अभूतपूर्व असा गोंधळ उडाला. ATM मध्ये खडखडाट होता कारण 100च्या नोटा व्यवहार पूर्ण करण्यास अपुऱ्या होत्या. दूध, अंडी, भाज्या, ब्रेड आधी दैनंदिन गरजा भागवायला पण लोकांकडे पैसा नव्हता. बँकांमध्ये दिवसाला कधी 2000, कधी 4000 तर कधी 4500 रुपये एवढेच बदलून मिळतील असे दररोज मनमानी निर्णय RBI ने दिले. 2000च्या नोटेचे सुट्टे कुणाकडे नव्हते. आणि कित्येक ATM मध्ये 2000च्या नोटा मावतच नव्हत्या. सारा भारत हातातले कामधंदे सोडून नोटा बदलायला बँकेच्या रांगेत तासनतास उभारला. शेकडो लोकांचा बँकेतल्या रांगेत जीव गेला, लाखो बँक कर्मचारी कित्येक महिने रात्रंदिवस बँकेत राहिले, तणावाने आजारी पडले आणि काही मेलेसुद्धा!
नोटबंदी करून मोदी लागलीच जपानला गेले. तिथे NRI संमेलनात ऍनाकोंडा पेक्षा मोठे तोंड उघडून भारतातल्या लोकांकडे लग्नसराईलाही कसा पैसा नाहीये यावर छद्मीपणाने हसून आले. नंतर भारतात पाय ठेवल्यावर त्यांना इथल्या अनागोंदीची कल्पना आली आणि मग गोव्यात त्यांनी मगरमच्छ के आंसू ढाळत “मला फक्त 50 दिवस द्या, 30 डिसेंबरपर्यंत. 1 जानेवारीला तुम्हाला तुमच्या स्वप्नांतला भारत दिसेल. नाहीतर मला पाहिजे त्या चौकात उभा करून हवी ती शिक्षा द्या” असले भावनिक आव्हान केले. नेहमीप्रमाणे भाबड्या भारतीय जनतेने संयम राखला.

भ्रष्टाचार, काळा पैसा, नकली नोटा आणि आतंकवाद या मोदींनी दिलेल्या खोट्या कारणांची कल्हई काही दिवसांतच उतरली. काश्मिरात अतिरेकी हल्ले झाले, त्यात अगदी 2000च्या सुद्धा नकली नोटा मिळाल्या, बाबू लोकांनी 2000च्या नोटांमध्ये लाच घ्यायला सुरुवात केली आणि एकाही काळा पैसा वाल्याला अटक झाली नाही किंवा कुणी नुकसान झाले म्हणून अटॅकने मेले नाही. मेले फक्त शेकडो सामान्य लोक! म्हणून मग नंतर Cashless economy चे पिल्लू सोडले गेले, 500 रुपये घेऊन मोदींनी PayTM आणि Jio साठी मॉडेलिंग सुद्धा केले. पुढे तेही चालेना म्हणून online transaction वर लकी ड्रॉ सुद्धा आणला. ज्या देशात 2% व्यवहार इंटरनेटवर होतात आणि 5% लोक इंटरनेट बँकिंग वापरतात त्याला रात्रीत कॅशलेस बनवू हे कारण देण्याएवढी मोठी बौद्धिक दिवाळखोरी या देशाने यापूर्वी कधीच पहिली नव्हती.

या गेल्या 10 महिन्यात जे काही आर्थिक नुकसान झाले ते अकल्पित आहे. देशातील सगळ्यात जास्त लोक ज्या क्षेत्रांत काम करतात त्या असंघटित क्षेत्रात प्रचंड मोठी मंदी आणि बेरोजगारी आली. शेतकऱ्यांचा एक हंगाम वाया गेला कारण बियाणे आणायला सुद्धा लोकांकडे पैसे नव्हते. GDP वाढीचा दर सध्या गेल्या दशकातला सगळ्यात कमी आहे. शेतीचा वृद्धीदर शून्याच्या खाली आहे. क्रूड तेल ऐतिहासिक कमी दराने असूनही देशात पेट्रोल, डिझेल रोज महागत आहे. वर्षाला 2 कोटी नवे रोजगार द्यायचे आश्वासन देणाऱ्या मोदींनी करोडो लोकांचे रोजगार घालवले आणि छोटे उद्योगधंदे कायमचे बसवले. रिअल इस्टेटला घरघर लागलीय. अवजड उद्योग दिवाळखोरीत जात आहेत. आणि कुठेही पैसे गुंतवायला जागा नसल्याने लोकांनी शेअर बाजारात पैसे लावून सेन्सेक्स छप्परतोड वर चाललाय, सुजवटी आलेल्या कुपोषित बालकासारखा. ही सेन्सेक्सची सूज ज्या दिवशी ओसरेल त्यादिवशी आतापर्यंत कसेतरी वाचून निघालेल्या उच्चमध्यमवर्गीयांना सामान्यांसारखे “बुरे दिन” पाहायला मिळतील.

15 ऑगस्टला मोदींनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना 3 लाख कोटीचा (नोटबंदीतल्या जवळपास 20% रद्द केलेल्या नोटा) काळा पैसा परत आला नसल्याचे सांगितले. अवघ्या 15 दिवसांत RBI ने 99% नोटा परत आल्याचे सांगून मोदींचे खोटारडेपण जगजाहीर केले. 15 लाख देण्याचे आश्वासन जुमला होते हे एकवेळ मान्य करता येईल, पण 15 ऑगस्टचे देशाला उद्देशून केलेले भाषण पण जुमला??? हे कुठले राजकीय चारित्र्य व नैतिकता आहे प्रधानसेवक महाराज? RBI च्या नोटबंदीवरच्या खुलाशानंतर कालपासून भक्त लोक कशा नकली कंपन्या कशा सापडल्या, करदात्यांची संख्या कशी वाढली हे थोतांड सांगत आहेत. पण ह्या गोष्टींचा आणि नोटबंदीचा संबंध नाहीये, आधारसक्ती आणि GST मुळे हे घडत आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टींचा भाजप आणि मोदींनी विरोधी पक्षात असताना कडाडून विरोध केला होता.

“डोंगर पोखरून उंदीर काढणे” ही म्हण सव्वाशे करोड भारतीयांना मोदींच्या अपार बुद्धिमत्तेने आणि अहंकाराने प्रत्यक्षात पाहायला मिळायली. RBI कडून सरकारला मिळणारा लाभांश यावेळेस कमी झाला. सारा भारत कित्येक दिवस ATM आणि बँकेच्या रांगेत उभा राहून जे कामाचे तास कमी झाले व त्या तासांची opportunity cost जर या नोटबंदीच्या नफा-नुकसानीच्या ताळेबंदास लावली व त्याने झालेले अर्थव्यवस्थेचे नुकसान जर कुणी मोजले तर ते कित्येक लाख कोटींच्या घरात जाईल. देशातील सगळी सत्ता एका अल्पमती व्यक्तीच्या हातात एकवटली आणि त्याने मनमानी केली तर काय होते याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. या देशात लोकशाहीची जागा सध्या तुघलकी फर्मानांनी घेतलीय आणि प्रजा पूर्णपणे दिव्यांग बनून हे सोसत आहे. विरोधी पक्ष आणि मीडियाला जे बोलायचे हिंमत नाही ते माझ्यासारख्या मूठभर विचारी लोकांना बोलावे लागणार आहे – “राजा नागडा आहे! होय, राजा नागडा आहे!!!”

डॉ. विनय काटे

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *