महाराष्ट्राचे शिल्पकार : जननायक तंट्या भिल्ल उर्फ रॉबिन हूड ऑफ इंडिया …

आजच्या जळगांव – धुळे जिल्ह्यास इंग्रज काळात खान्देश म्हणत. खानदेशाला लागून वरच्या बाजूने सातपुडा डोंगरांची रांग आहे. याला लागूनच होळकरांचा पश्चिम निमाड आणि शिंद्यांचा पूर्व निमाड हे भाग होते. खानदेश होळकरांचा पश्चिम निमाड आणि शिंद्यांची पूर्व निमाडची हद्द जळगाव जिल्हातील पालजवळ मिळत होती. माउंटअबू पासून सुरु होणार विंध्य, सातपुडा आणि बस्तरपर्यत च्या डोंगराळ भागात भिल्ल व आदिवासींची मोठी संख्या आहे.
मराठीशाहीचा अस्त झाल्यानंतर त्या काळात सातपुडातील बहादूर भिल्लांची अनेक वर्ष गनिमी काव्यानं इंग्रजांशी झुंज दिली. ह्यात सातमाळातील भागोजी नाईक, सातपुड्यातील कजरसिंग नाईक, भीमा नाईक आणि तंट्या भिल्लाचा संघर्ष हे भारतीय स्वातंत्र लढ्यातील काही सोनेरी पाने आहेत.

 

 

भारतीय स्वातंत्र लढ्याच्या इतिहासाप्रमाणे या आदिवासी भिल्ल क्रांतिकारकांचा इतिहास हि महत्वाचा आहे जो बाकीच्या क्रांतिकारकांच्या प्रमाणे सगळ्यांच्या पुढे आला नाही. बलाढ्य ब्रिटिश सत्तेला सतत अकरा वर्ष सळो कि पळो करणारे हे क्रांतिकारक दुर्लक्षितच राहिले. व त्यांना ब्रिटिश सत्तेने कायम दरोडेखोर याच दृष्टिकोनातून बघितले.

 

 

वरील उल्लेख केलेले जे क्रांतिकारक आहेत त्यातील एक विलक्षण क्रांतिकारक म्हणजे तंट्या उर्फ तात्या भिल्ल होय. याला ब्रिटिश सरकार कायमच दरोडेखोर म्हणून बघत आले. ब्रिटिशाना सतत ११ वर्ष हुलकावणी देणारा हा क्रांतिवीर १५० वर्षांपूर्वी आदिवासी व शेतकऱ्यांना, सावकार, मालगुजार आणि जुलमी सरकार विरुद्ध पेटून उठण्याची प्रेरणा देणार तंट्या हा आदिवासी – शेतकऱ्यांच्या क्रांतीच पहिला नायक होय. त्याने सातपुड्याच्या दोन्ही भागात – खानदेश व नर्मदा खोऱ्यातील आदिवासी शेतकऱ्यांत राष्ट्रीयत्वाची भावना जागवली. ज्या काळात पुण्यात महात्मा जोतीराव फुले समाज सुधारणेसाठी कार्यरत होते त्याच काळी हा भिल्ल नायक आदिवासी, किसान ह्यांच्या पारतंत्र्याच्या बेड्या झुगारून देण्यासाठी एकाकी लढा देत होता.

 

 

हा तंट्या भिल्ल अत्यंत साधा भोळा होता त्याची वडिलोपार्जित जमीन कर्जापोटी पाटलाने बळकावली. कर्ज फेडू इच्छिणाऱ्या तंट्याला खोट्या गुन्ह्यात अडकवले शिक्षा भोगून आल्यावर तंट्या भिल्ल मोलमजुरी करू लागला पुन्हा गावकर्यांनी पाटलाच्या मुलीच्या प्रेमसंबंधाचा आरोप ठेऊन हुसकावून लावलं व पुन्हा खोटे आरोप ठेऊन जेल मध्ये डांबले.

माणूस म्हणून शांत जीवन जगण्याची धडपड करणाऱ्या तंट्याला जमीन हडप करणारे पाटील-मालगुजार त्यांना साथ देणारे सावकार पोलीस व सर्वच शासन यंत्रणेने जगणे असाह्य केले. अन्यायाने पिचून गेलेला तंट्या बदलत गेला. आपल्या व्यवस्थेशी आणि बलाढ्य ब्रिटिश राजसत्तेशी लढा सुरु केला.
जगणे असाह्य झाल्याने तंट्या मालगुजार – सावकारांना लुटू लागला. पोलीस चौक्यांवर हल्ला करू लागला. सत्ताधाऱ्यांना डाकू दरोडेखोर वाटणारा तंट्या हा डाकू नव्हताच. सावकार – मालगुजरांना लुटून तो गरिबांना वाटून टाकी. दुष्काळात सावकारांची आणि सरकारी धान्याची गोदाम फोडून गरिबांना मोफत धान्य वाटू लागला. गरजूना बिनव्याजी कर्ज देवू लागला. स्त्रियांना तो पाठीराखा वाटत होता.

 

 

रिबांचा वाली, त्यांचा रक्षणकर्ता, जंगलाचा सार्वभौम राजा अशी त्याची प्रतिमा जनमानसात बनली होती. त्याच्या जिवंतपणीच खानदेश – नर्मदा खोऱ्यात तो एक दंतकथा बनला होता. त्या काळी त्याच्या कथा व गीते घराघरात पोहोचली होती. तंट्याला पकडण्यासाठी १०,५०० रुपये आणि पंचवीसशे एकर जमिनीचे बक्षीस ब्रिटिशांनी देऊ केले होते व त्याच बरोबर होळकरांनी सुद्धा वेगळे बक्षीस ठेवले होते. याच्या वरूनच तंट्या भिल्लाने किती त्रास ब्रिटिश सत्तेला दिला होता हे लक्षात येते. त्याच बरोबर ब्रिटिशांनी तंट्याला पकडण्यासाठी ‘तंट्या पोलीस’ नावाचे स्वतंत्र पोलीस दल स्थापन केले. गावागावात तंबु उभे करून पोलीस चौक्या उभ्या केल्या होत्या. मालगुजार व सावकारांना मोफत शास्त्रे वाटली होती तरीही हा वीर ११ वर्ष पोलिसांच्या हातांवर तुरी देवून डोंगरदऱ्यात तळपत होता.

तंट्याचे जीवन मानवतेचे संदेश देणारे होते. त्याच्यात नेतृत्वाचे सगळे गुण होते. तो निस्वार्थी होता. स्वतःसाठी त्याने काही ठेवले नाही. त्याची प्रचंड बुद्धिमत्ता, चपळाई, प्रसंगावधान, दयाळूपणा, सभ्यपणा, न्यायीदृष्टी, उदार दृष्टिकोन या गुणांबद्दलच्या लोककथा – लोकगीते गावोगावी पसरली होती. हे सारे ब्रिटिश तत्कालीन अधिकाऱ्यांनी त्यांच्या पत्रव्यवहारात अहवालात नमूद करून ठेवले आहॆ.

 

 

ब्रिटिश राजसत्तेच्या काळात निजाम, होळकर, शिंदे व इतर संस्थानिक ब्रिटिश सत्ते बरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होते त्या काळात हा लोकविलक्षण नायक जनाधारावर झुंजत होता ११ वर्ष ब्रिटिश सत्तेच्या तोंडचे पाणी तंट्याने पळविले. ज्या काळात पुण्यात महात्मा जोतीराव फुले समाज सुधारणेसाठी कार्यरत होते त्याच काळात हा भिल्ल नायक आदिवासी-किसान ह्यांच्या पारतंत्र्याच्या बेड्या झुगारून देण्याचा एकाकी लढा देत होता .

 

 

हा जननायक तात्या भिल्ल, तंट्या भिल्ल तसेच तंट्या भिल्ल मामा व रॉबिन हूड ऑफ इंडिया या नावाने ओळखत होते. हा जननायक फंद फितुरी मुळेच इंग्रजांच्या हाती लागला व इंग्रजांनी ४ डिसेम्बर १८८९ ला या जाननायकाला फाशी दिली. त्याचे पार्थिव पाताळपाणी (मध्यप्रदेश) या ठिकाणी रेल्वे ट्रॅक च्या कडेला फेकून दिले. ज्या ठिकाणी या जाननायकाचे पार्थिव सापडले तिथे त्याचे मंदिर हि उभारले आहे व आज सुद्धा या ठिकाणी येथून जाणाऱ्या रेल्वे गाड्या या मंदिराच्या समोर मानवंदना देण्यासाठी काही सेकंद थांबतात.

 

 

दुर्दैवाने इतिहासात तंट्याची नोंद एक डाकू व दरोडेखोर अशीच झाली आहे. इतिहास लिहिणाऱ्यांनी गुन्हेगार जातीत जन्मलेल्या तंट्या भिल्लवर हा अन्याय केला. महाराष्ट्रातील लोककथा, लोकनाट्य, पोवाडे आणि लोकगीतातही तंट्या लोकांसमोर येत होता तेही एक डाकू आणि दरोडेखोर हा कपाळावर डाग घेऊनच. एक दशकभर हा क्रांतिवीर बेदखल राहिला त्याची हि एकाकी झुंज आदिवासी स्वातंत्रलढयातील एक सोनेरी पान आहे

 • डिस्ट्रिक्ट गॅझेटर ईस्ट निमार मध्यप्रदेश.
 • तंट्या भिल्ल – विशवनाथ सखाराम खोडे
 • चांद के फांसी
 • जननायक तंट्या भिल्ल – बाबा भांड
 • तात्या उर्फ तंट्या भिल्ल यांचे चरित्र – पं. मदन मोहन जोशी
 • कागदपत्रे – स्टेट अर्चिव भोपाळ
 • होळकर सरकार गॅझेट, इंदोर दरबार २६ नोव्हे १८८८संकलन : संतोषराजे गायकवाड

#आझादी_के_दिवाने
#जागर_क्रांतीचा
#जागर_इतिहासाचा

1 comment

 1. जय शिवराय…!!!
  माझे संकलन आपण प्रसिद्ध केल्या बद्दल आपला आभारी आहे…
  धन्यवाद…!!!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *