मंदिराबाहेरील देवाची कहाणी…

साधारण तीस वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. मुंबईमध्ये परळ भागातील प्रसिद्ध टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या बाहेर एक गृहस्थ दररोज समोर उभ्या असलेल्या गर्दीकडे पाहत रहायचे. एकदा एका मायलेकीने त्यांना टाटा हॉस्पिटलचा पत्ता विचारला. तेव्हा त्यांनी अज्ञानातुन पालिकेच्या शीव येथील सरकारी रुग्णालयाचा पत्ता दिला, मात्र नंतर आपली चुक नंतर त्यांच्या लक्षात आली. परळमध्ये राहुन आपल्याला टाटा हॉस्पिटलबद्दल माहिती नाही, मग बाहेरगावाहुन येणाऱ्या लोकांचे काय हाल होत असतील याचा त्यांनी विचार केला. मृत्युच्या दारात उभं असणाऱ्या रुग्णाच्या आणि त्याच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावरील तणाव, अपरिचित ठिकाणी त्यांची होणारी धावपळ, कुठे शोधायचे, कोणाला भेटायचे, कुठे भेटायचे, राहायचे कुठे, खायचे काय असे असंख्य प्रश्न चेहऱ्यावर घेऊन वावरणारी ती लोकं पाहिलं की हे गृहस्थ मनातुन खुप अस्वस्थ व्हायचे. आपल्या आजोबांनी सांगितलं होतं “आपण समाजाचं देणं लागतो”, म्हणुन आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे याचा त्यांनी विचार केला आणि तिथुन सुरु झाला त्यांच्या वेगळ्या कामाचा प्रवास. त्या गृहस्थाचे नाव म्हणजे हरखचंद सावला.

लहानपणी शाळेत असताना मित्राला शाळेची फी भरता येत नव्हती म्हणुन स्वतः पायी प्रवास करुन वाचलेल्या पैशातुन मित्राला मदत करणाऱ्या सावलांनी मोठे पाऊल उचलले होते. पण प्रमुख अडचण होती पैशांची. मात्र त्यावरही त्यांनी मार्ग काढला. त्यांनी घरातील जुन्या कपड्यांपासुन गोधड्या बनवुन रुग्णांना वाटल्या. रद्दी विकुन पावसाळ्यात छत्र्या वाटपाचे उपक्रम राबवले. परंतु तरीही पैशांची चणचण जाणवु लागली.

आणि मग एक दिवस त्यांनी आपलं चांगल्या स्थितीत सुरु असणारे हॉटेल भाड्याने दिलं आणि त्यातुन उभे राहिलेल्या पैशांतुन टाटा हॉस्पिटल समोरच्या असलेल्या कोंडाजी चाळीच्या रस्त्यावर आपली अन्नदान सेवा सुरु केली. कॅन्सरग्रस्त रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दोन वेळचे भोजन मोफत द्यायचा त्यांचा हा उपक्रम लोकांनाही आवडला.

सुरुवातीला डाळभाजी, भात, चपाती असं भोजन सुरु केले. पन्नास लोकांना भोजन द्यायला सुरुवात केली. हळुहळु ही संख्या वाढु लागली. असंख्य हात त्यांच्या मदतीला येऊ लागले. बघता बघता वर्ष उलटत गेली. कधी थंडी, कधी उन तर कधी मुंबईचा मुसळधार पाऊसही त्यांच्या कामात खंड पाडु शकला नाही. १२ वर्ष ही सेवा दिल्यानंतर त्यांनी आपले कार्य अजुन व्यापक करण्याचा निर्णय घेतला. आज केवळ टाटा हॉस्पिटलच नाही, तर जेजे, कामा, सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमधील ७०० लोकांना दोन वेळचे मोफत जेवण दिलं जात आहे. गेली तीस वर्ष ही सेवा अखंड सुरु आहे.

हरखचंद सावला एवढ करुनच थांबले नाहीत. त्यांनी “जीवन ज्योत कॅन्सर रिलीफ अँड केअर ट्रस्ट” स्थापन केला. त्या माध्यमातुन त्यांनी गरजु रुग्णांना मोफत औषध पुरवणे सुरु केले. त्यासाठी त्यांनी “औषध बँक” स्थापन केली. या बँकेत तीन फार्मासिस्ट व तीन डॉक्टरांची अन् सोशल वर्करची टीमच त्यांनी कामाला लावली. लोकांच्या घरातील शिल्लक राहिलेली औषधे तपासुन त्यांचा वापर गरीब रुग्णांसाठी केला जाऊ लागला. त्यांनी सिक बेड सर्व्हिस, कॅन्सरग्रस्त बाल रुग्णांसाठी खेळण्यांची टॉयबँक, सहली, कृत्रिम अवयव पुरवणे, मनोरुग्णांवर उपचार, त्यांची घरवापसी, रस्त्यावरील भिकाऱ्यांवर उपचार, त्यांची स्वच्छता, दुखापतग्रस्त जनावरांवर उपचार असे अनेक उपक्रम सुरु केले. २६ जुलैच्या मुंबई महापुरामुळे जखमी झालेल्या तीन हजार कबुतरांवर त्यांनी उपचार केले. “जीवन ज्योत” ट्रस्टच्या माध्यमातुन ६० हुन अधिक उपक्रम राबवले जात आहेत.

तुम्ही आजही परळला गेलात तर तिथे तुम्हाला अत्यंत साधा पांढरा पायजमा कुर्ता घातलेला परंतु चेहऱ्यावर समाधान असणारा हा अवलिया रुग्णांच्या ताटात अन्न वाढताना, रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची आस्थेने चौकशी करताना, त्यांना मानसिक आधार देताना, औषध पुरवताना इतकंच काय एखादा रुग्ण ज्याला कुणीच नसतं तो दगावला तर त्याचे अंत्यसंस्कार करताना दिसेल. ६० वर्षीय हरखचंद सावला आजही त्याच उत्साहाने कार्यरत आहेत. कुठलाही गाजावाजा नाही, अवडंबर नाही की प्रसिद्धीचा मोह नाही. विशेष म्हणजे गुगलवर अथक परिश्रम केल्यानंतर त्यांचा फोटो सापडला. त्यांनी आतापर्यंत १०० हुन अधिक वेळा रक्तदान केले आहे. ३० वर्षात दहा ते बारा लाख रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना त्यांनी दोन वेळचे मोफत जेवण दिले आहे. संध्याकाळी झोपताना त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान असते ते सर्वांनाच मिळत नाही. सावलांच्या अफाट जिद्दीला, कार्याला शतशः प्रणाम !

इतकी वर्षे क्रिकेट खेळुन अनेक विक्रम, अनेक शतके, अनेक धावा केल्या म्हणुन सचिन तेंडुलकरला “देवत्व” बहाल करणारे करोडो लोक आपल्या देशात पहायला मिळतील. पण ३० वर्षात १०-१२ लाख कॅन्सरग्रस्त रुग्णांना अन् त्यांच्या नातेवाईकाना दोन वेळचे भोजन मोफत देणाऱ्या हरखचंद सावलांना कोणी ओळखतही नाही. त्यांना देव मानणे तर दुरची गोष्ट. ही आहे आपल्या देशातील माध्यमांची कृपा आणि लोकांची मानसिकता.

कधी प्रभादेवीच्या सिद्धीविनायक मंदिरात, कधी शिर्डीच्या साईबाबा मंदिरात, तर कधी तिरुपतीच्या बालाजी मंदिरात आणि नाही जमलंच तर जवळपासच्या मंदिरात जाऊन देव शोधणाऱ्या करोडो आंधळ्या भक्तांना हा मंदिराबाहेरचा देव कधीच सापडणार नाही. तो आपल्या आजुबाजुलाच आहे पण आपल्याला मात्र त्याची खबर नाही अशी अवस्था आहे. सगळे वेड्यासारखे कुठल्यातरी बापु, महाराज, बाबाच्या मागे पळत असतात. लोकांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन हे सगळे बापु, महाराज, बाबा कोट्याधीश होतात, मात्र भोळ्या भक्तांच्या व्यथा, वेदना आणि संकटे काही मरेपर्यंत संपत नाहीत.

मंदिरात देव शोधणाऱ्या भक्तांना देव सापडला का नाही ते माहीत नाही, परंतु गेल्या ३० वर्षात लाखो कॅन्सरग्रस्त रुग्णांना अन् त्यांच्या नातेवाईकांना हरखचंद सावलांच्या रुपात मंदिराबाहेरचा देव सापडला आहे.

लेखकाच्या पूर्व परवानगी शिवाय लेख शेअर करू नये…

2 comments

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *