सद्यस्थितीतील मराठा समाज…

मराठा असल्याचा अभिमान बाळगण्यात काहीच गैर नाही. पण तो अभिमान बाळगण्यालायक होण्यासाठी प्रत्येक मराठा तरुणाने प्रयत्न करायला हवेत. सद्यस्थितीतील मराठा समाजाला उज्वल भविष्याकडे नेण्यासाठी फक्त आरक्षणाच्या शिडीची गरज नाही तर मराठा समाज खडखडून जागा होण्याची जास्त गरज आहे.

मराठा समाजातील आई आज बऱ्याचदा मराठा असल्याचा अभिमान बाळगणाऱ्या आपल्या मुलाला उपरोधाने म्हणते, “मराठयाचा बाणा आणि डोईवर व्हाणा…”

मराठा समाज अधोगतीकडे वाटचाल करीत असल्याचेच हे घोतक म्हणावे लागेल. सद्यस्थितीतील मराठा समाजातील एखादी व्यक्ती आहे म्हणुन तिला काही विशेष अधिकार, मान-सन्मान वगैरे मिळत आहेत अस कोणतही चित्र महाराष्ट्रातील कोणत्याही कानाकोपऱ्यात दिसत नाही. आज महाराष्ट्रात जी मराठा समाजाकडुन आरक्षणाची मागणी केली जाते आहे हे मराठा समाजाच्या अधोगतीचच लक्षण म्हणावे लागेल. कोणत्याही प्रगत देशाच लक्षण काय असावं ? की त्या देशातील आरक्षण क्रमाक्रमाणे कमी होत जावं. पण आपल्या देशात तर आरक्षण मागणाऱ्या समाज गटांच प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

महाराष्ट्रात ब्राम्हण समाजाखालोखाल मराठा समाज मानला जातो. त्यामुळे पुर्वी त्याखालच्या समाजाकडुन मराठा समाजाला मान दिला जायचा. पण आता तो दिला जातोच याची खात्री देता येत नाही. आज महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या राजकारणातही मराठा समाजाचा वरचष्मा आहे असं गृहीत धरलं तरी मराठा समाजातील चार डोकी पिढ्यानपिढ्या राजकारणात आहेत. चार डोकी श्रीमंत आहेत म्हणुन संपूर्ण मराठा समाज सधन, श्रीमंत अथवा सुखी आहे असं गृहीत धरता येत नाही ना ! समजा असं गृहीत धरल की एकेकाळी मराठा समाज इतर समाजांपेक्षा सधन होता. पण त्या वेळच्या आणि आजच्या परिस्थितीत फारच फरक आहे. पुर्वी मराठा समाज राजा होता आता रामागडी झालेला आहे. राजकारण वगैरे क्षेत्र सोडा आणि उद्यागक्षेत्रात डोकावले तर आज मराठा समाजातील किती लोक मोठे उद्योगपती आहेत, ज्यांची नावे जागतिक स्तरावर आदराने घेतली जातात ? सद्यस्थितीतील मराठा समाज पुढे जात नाही त्याला मराठा समाजाची एक वृत्ती कारणीभूत आहे, ती वृत्ती म्हणजे खेकडयाची वृत्ती ! एक वर जात असेल तर दुसरा खालून त्याची टांग खेचतो. त्यासाठी मराठा समाज देशातच नव्हे तर जगभरात विनाकारण बदनाम आहे. सरसकट सर्वच मराठा समाज खेकड्याच्या वृत्तीचा असता तर शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य निर्माण करुच शकले नसते.

मुळात मराठा समाज म्हणजे लढवय्या समाज. हिंमतीचे, धाडसाचे कोणतेही काम त्याला करायला सांगा तो नक्की करणार. पण व्यावसाय म्हटला की त्याचे पाय डगमगायला लागतात. कोणी तरी लिहलय, “मराठी माणूस व्यावसायात उतरत नाही त्याला त्यांच्या बायका कारणीभूत आहेत.” मराठा समाज ही दुदैवाने त्याला अपवाद नाही. मराठा समाजातीला बायकांची नवऱ्यांना उद्योगधंद्यापासून दूर ठेवण्याची वृत्तीही काही अंशी मराठा समाजाच्या अधोगतीला कारणीभूत आहे. मराठा समाजातील मुलींना महिन्याच्या महिन्याला एकरकमी पगार मिळविणारा नवरा हवा असतो. लाखांची उलाढाल करणाऱ्या व्यावसायिक असणाऱ्या मराठा समाजातील तरूणाला वधू मिळविण्यासाठी वणवण करावी लागते.

पुर्वी श्रीमंत असणाऱ्या मराठा समाजाने त्याकाळी बढेजावपणा करण्यासाठी काही चाली, रुढी आणि परंपरा सुरु केल्या ज्या आजच्या मराठा समाजाला जाचक ठरत आहेत. त्यांचा नव्याने विचार करायला हवा. आजही मराठा समाजात लग्नकार्यावर अमाप पैसा खर्च केला जातो. प्रसंगी हा खर्च कर्ज काढूनही केला जातो. मराठा समाजाचे सामुहिक विवाह सोहळे क्वचितच पार पाडले जातात. त्यामुळे सद्यस्थितीतील मराठा समाज कर्जबाजारीपणामुळे ग्रस्त झालेला समाज झाला आहे. राजे महाराजांचा काळ संपल्यावर मराठा समाजाने ही नाईलाजाने शेती हा व्यावसाय म्हणुन स्विकारला आणि तेथेच तो फसला. आज ही बराचसा मराठा समाज शेतीवर अवलंबून आहे. लोकसंख्या वाढत गेली तशी प्रत्येकाच्या वाट्याची शेती कमी होत गेली. मग मराठा समाजावर दुसऱ्या समाजातील लोकांची चाकरी करणे भाग पडले. तेथे ही कोकणस्थ मराठा समाजाने आपला मराठी बाणा सोडला नाही. होळी गणपतीला गावी जायला सुट्टी नाही दिली तर ते प्रसंगी नोकरीला ही लाथ मारुन जातात.

मराठा समाजात सारासार विचार करण्याची क्षमताच नष्ट झालेली आहे. मध्यंतरी कोठे तरी वाचनात आले मराठा समाजाचा मुंबईत एक ही हॉल नाही ! खर की खोटं देव जाणे, पण जर हे खंर असेल तर ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे. पुर्वी लोकांच्या हिंमतीला, मेहनतीला आणि प्रामाणिकपणाला किंमत होती. पण आज तुमच्या जवळ असणाऱ्या शिक्षणाला, कलागुणांना आणि त्याहून ही अधिक तामच्या जवळ असणाऱ्या पैशाला अधिक किंमत आहे. मराठा समाजाला आपला वंश पुढे चालावा याचे भारी कौतुक त्यामुळे त्यांना मुलगा हवा असतो. याचा अर्थ ते मुलींचा द्वेश करतात असा नाही. पण त्यामुळे त्याचा कौटुबिक पसारा वाढतो आणि त्या वाढलेल्या पसाऱ्याखाली तो घुसमटून दम तोडतो. अखंड मराठा समाज एकत्र असा कधी आलेलाच नाही.

सद्यस्थितीतील मराठा समाज तुकड्या तुकड्यात विखुरलेला दिसतो. त्या प्रत्येक तुकड्यातील मराठा समाजाची मानसिकता, विचारसरणी भिन्न-भिन्न आहे. मराठा समाजात अनेक महान व्यक्ती जन्माला आल्या पण मराठा समाजाचा स्वतंत्रपणे विचार करावा असा विचार त्यापैकी एकाच्याही मनाला कधी शिवला नाही. मराठा समाजानेच समाजातील जातीभेद नष्ट व्हावेत म्हणुन प्रथम पुढाकार घेतला. पण आज सर्वांना आरक्षण बहाल करणाऱ्या मराठा समाजावरच आरक्षण मागण्याची वेळ आलेली आहे. आज महाराष्ट्रात मराठा समाजातील सर्वांनाच एका तराजूत तोलले जात आहे.

पण कोणाच्या हे का लक्षात येत नाही की, मराठा समाज चार भागात विभागला गेलेला आहे. एक राजा महाराजांच्या थाटात जगणारा मराठा समाज, एक श्रीमंत मराठा समाज, एक मध्यमवर्गीय पांढरपेशा मराठा समाज आणि एक दिनदलीत गरीब मराठा समाज. एखादा रस्त्यावर राहणारा गरीब मराठा समाजातील आहे म्हणुन त्याच गरीब असणं आपण अजून किती वर्षे नाकारणार आहोत ? आज मराठा आरक्षणाची मागणी होतेय याचा अर्थ आज मराठा समाजाची सहनशक्ती संपलेली आहे. आता यापुढे होईल तो उद्रेक !

सद्यस्थितीतील मराठा समाज सैरभैर झालेला आहे. त्याला कोणीही वाली उरलेला नाही. खरं म्हणजे मराठा समाजाने स्वतःच्या पायावर स्वतःच धोंडा मरून घेतलेला आहे. मराठा समाज नेहमीच प्रसिध्दी माध्यमांपासून दूर राहिल्यामुळे आज त्यांच्या दुःखाची कोणी दखलच घेत नाही. मराठा आरक्षणाला उचलून धरण्यासाठी प्रसारमाध्यमांनी किती मदत केली हा संशोधनाचा विषय आहे. सद्यस्थितीतील मराठा समाजाचा विकास चारी दिशांनी खुंटला आहे. आजचा मराठा समाज स्वप्ने पाहायचीच विसरून गेलेला आहे. ज्यांच्यात स्वप्ने पाहण्याची क्षमता आहे ते परदेशात स्थिरावता आहेत. पुर्वी मराठा समाजातील तरुण छाती पुढे काढून सांगत असत मी मराठा आहे !

पण आज त्याला तस करण्याची लाज वाटते कारण आज मराठा समाजातील लोकांच दखल घेण्याजोग कर्तृत्वच दिसत नाही. आज मराठा समाज शिक्षण क्षेत्रातील आरक्षणामुळे बराच मागे पडलेला आहे. व्यक्तीशः मराठा समाजाच्या म्हणाव्यात अशा शिक्षणसंस्था महाराष्ट्रात नाहीत. मराठा समाजातील तरूण तरूणी फक्त पदवीधर होण्यातच धन्यता मानत आहेत. गेल्या काही दशकात फार प्रसिध्दी लाभलेले मराठा समाजातील चेहरे उदयाला येताना दिसले नाहीत.

सद्यस्थितीतील मराठा समाजाच्या हितासाठी संपूर्ण मराठा समाजाला एकत्र येऊन कार्य करण्याची नितांत आवशकता आहे. फक्त आरक्षण मिळाल्यामुळे मराठा समाजाला चांगले दिवस येतील असे खात्रीने नाही सांगता येणार. सद्यस्थितीतील मराठा समाजाला या परिस्थितीतून बाहेर काढायचे असेल तर प्रत्येकाला माळेतील एक मनी व्हावे लागेल. सद्यस्थितीतील मराठा समाजाची अवस्था बिकट असली तरी मराठा समाजातील तरूणांनी व्यसनांच्या आहारी जाता कामा नये. मराठा समाज हा स्वभवतः सहनशील आहे, त्यामुळे आपल्या दुःखाची तो उघडपणे वाच्यता करणार नाही. पण तो भडकला तर त्याला आवरणे शक्य होणार नाही.

मराठा समाजातील प्रत्येक घटकाने आता समाजाच्या विकासाच्या दृष्टीने आपल्याला आपल्या परीने काही भरीव कार्य करता येईल का याचा विचार करायला हवा ! जुन्या चाली, रूढी आणि परंपरा ज्या संपूर्ण मराठा समाजात मानल्या जात नाहीत त्या नष्ट कराव्यात. मराठा असल्याचा अभिमान बाळगण्यात काहीच गैर नाही. पण तो अभिमान बाळगण्या लायक होण्यासाठी प्रत्येक मराठा तरूणाने प्रयत्न करायला हवेत. सद्यस्थितीतील मराठा समाजाला उज्वल भविष्याकडे नेण्यासाठी फक्त आरक्षणाच्या शिडीची गरज नाही तर मराठा समाज खडखडून जागा होण्याची जास्त गरज आहे.

लेखक – निलेश बामणे.
साभार- MarathiShrushti.Com

3 comments

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *