“गडकिल्ले महाराष्ट्राचे” या ग्रंथराजावरचं मान्यवरांचं निरपेक्ष-परखड भाष्य. हा ग्रंथराज का घ्यावा याचा जणू परिपाठच. 0

श्री प्रमोद मांडे हे एक कलंदर माणूस. महाराष्ट्रातल्या किंबहुना भारतातील सर्व गडदुर्ग पाहण्याच्या वेडाने त्यांस झपाटले आहे. असे वेड डोक्यात घेतलेली माणसेच इतिहास घडवतात. “गडकिल्ले महाराष्ट्राचे” हा ग्रंथ रचून प्रमोद मांडे यांनी इतिहास घडवला आहे. या ग्रंथात एकूण ३९१ गडकिल्ल्यांची माहिती आली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सर्व दुर्ग स्वतः पाहून आल्यावरच श्री मांडे यांनी पुस्तकरूपात मांडले आहेत. श्री प्रमोद मांडे हे एक मोठे दुर्गपंडित आहेत. महाराष्ट्राच्या भूमीवर, सह्याद्रीवर, छत्रपती श्री शिवाजी महाराजांवर, महाराष्ट्राच्या इतिहासावर त्यांचे नितांत प्रेम आहे. या प्रेमापोटी त्यांनाही अवघा महाराष्ट्र धांडोळला. श्री मांडे यांनी दुर्गविषयक हे फार मोठे काम केले आहे आणि प्रामाणिकपणे जनतेसमोर ठेवले आहे. या ग्रंथात कदाचित प्रथमच महाराष्ट्रातील दुर्गांची एकूण मोजदाद आली असावी. हा (गडकिल्ले महाराष्ट्राचे) ग्रंथराज वाचकप्रिय होईल यात काहीच शंका नाही. त्यासाठी श्री प्रमोद मांडे यांनी जी मेहनत, कष्ट घेतले आहेत आणि आर्थिक झाले सोसली आहे, त्याबद्दल ते कौतुकास पात्र ठरले आहेत.
जेष्ठ इतिहास तज्ञ :- निनाद बेडेकर

दुर्गमहर्षी मांडे सर
मांडे सरांचे फिरणे एखाद्या झंझावातासारखे असते. एकदा एक डोंगररांग धरली की त्या भागातली मंदिरे, लेणी, ऐतिहासिक वाडे, विहिरी, गडकिल्ले या साऱ्या गोष्टी सर एका मागोमाग एक अशी झाडून पाहतात. १९६७ पासून किल्ले पाहायला सुरुवात केलेल्या मांडे सरांनी आज अखेर शेकडो किल्ले कधी पायी तर कधी गाडीवरून फिरून पाहिले आहेत. त्यांचं “गडकिल्ले महाराष्ट्राचे” हे पुस्तक म्हणजे शंभर नंबरी अस्सल सोनं आहे. या भल्या मोठ्या दणदणीत वजनदार पुस्तकाने महाराष्ट्रात नक्की किल्ले किती ही चर्चाच जणू थांबविली. मांडे सरांचे दुसरे वैशिष्टय म्हणजे त्यांची तल्लख स्मरणशक्ती. त्यांना कधीही- कुठूनही व कोणत्याही वेळेला फोन केला व एखाद्या किल्ल्याजवळील गावाची माहिती त्यांना विचारली की पटकन ते त्या गावाचे नाव जिभेवर खेळत असल्यासारखे सांगतात. कुठला किल्ला कुठे वसला आहे, तेथे पाण्याची व मुक्कामाची सोय काय, शेजारील पाहण्यालायक ठिकाणे कोणती या साऱ्या साऱ्या गोष्टी त्यांच्या तल्लख मेंदूत फिट असतात. दुर्गांवर या माणसाचे किती जीवापाड प्रेम आहे याचा अनुभव त्यांच्या घरी गेल्याशिवाय कोणालाही येणार नाही. त्यांच्या कॉम्पुटरवरील त्यांनी स्वतः काढलेले गडांचे हजारो फोटो, त्यांचा पुस्तकांचा संग्रह व त्यांचे लाखमोलाचे अनुभव ऐकताना वेळ कसा गेला याचे भान आपणास राहत नाही.
साक्षेपी दुर्ग अभ्यासक:- श्री भगवानराव चिले

भारतीय दुर्गांचा जिवलग: प्रमोद मांडे
प्रमोदने महाराष्ट्रातले अवघे दुर्ग, कोट स्वतः बघून त्यांना पुस्तकरूपाने जिवंत केलेच, पण सोबत महाराष्ट्राशिवाय कर्नाटक- तामिळनाडू, गोवा, केरळ, आंध्र, गुजराथ, राजस्थान, मध्यप्रदेश, दिल्ली या सर्व प्रांतात दुर्गनिरीक्षणे करून तेथीलही महत्वाचे दुर्ग-कोट यांची नोंद केली. त्याचे काम ” यासम हेच” असे आहे. “प्रमोद मांडे !! खरे म्हणजे भारतभ्रमण केलेला एखादा दुर्गप्रेमी फारतर व्याख्याने देत सपाटीवर फिरत असता. पण प्रमोदने दुर्ग पुरंदर जणू दत्तकच घेऊन तिथे साफसफाईची कामे सातत्याने घडवून आणली आणि वेगळी तटरचना शोधूनही काढली. ” प्रमोद भाऊ दुर्गांचा अभिमान जागृत करतात आणि त्याबरोबर या देशाबद्दलची आत्मीयता निर्माण करतात.
जेष्ठ दुर्गतज्ञ:- आनंद पाळंदे

एके दिवशी मांडेसाहेब माझ्या घरी आले असताना त्यांनी त्यांच्या संकल्पित “गडकिल्ले महाराष्ट्राचे” ग्रंथाबद्दल सांगितलं. मी लगेचच त्यांच्या प्रसिद्धीपूर्व नोंदणीत माझी प्रत नोंदवून टाकली. कारण त्या प्रसिद्धीपूर्व सवलतीपेक्षा माझ्या एका गडमित्राचं पुस्तक येत आहे त्याला प्रोत्साहन मिळावं हा त्यामागचा उद्देश होता. सरतेशेवटी तब्बल ४३२ पानांचा हा दणदणीत ग्रंथराज जेंव्हा माझ्या हातात आला तेंव्हाच त्यांच्या आजवर किल्ल्यांबद्दल न लिहिण्यामागचं इंगित माझ्या लक्षात आलं. माझ्यासारखं फुटकळ न लिहिता त्यांनी हा “गडकोश” निर्माण केला. त्यांबद्दल त्यांचं खरोखर अभिनंदनच करायला हवं. आपल्याला एखादी शंका आली आणि ती ह्या हसतमुख डोंगरभावाला विचारली की डोंगराएवढ्या मनाच्या मित्राकडून लगेचच शंकासमाधान होतं हा माझा अनेक वर्षापासूनचा स्वानुभव आहे. त्यांच्या दुर्गविषयक कामांमुळे त्यांना श्री. उद्धवराव ठाकरे यांच्या हस्ते “दुर्गज्ञानी” आणि श्रीमंत शाहू महाराजांच्या हस्ते “दुर्गमहर्षी” अश्या पदव्या देण्यात आल्या आहेत. “योग्य माणसाला योग्य असाच बहुमान मिळाला.” अशी सगळ्यांची भावना झाली होती.
जेष्ठ दुर्ग अभ्यासक:- श्री प्र. के. घाणेकर

छत्रपती शिवबांच्या गडकोटांची साद परत महाराष्ट्राच्या कानीकपाळी दृग्गोचर होणार, दुर्गमहर्षी प्रमोद मांडे सरांच्या ४० वर्षाच्या गडकोट साधनेचं गोमटं फळ गडकोट पाईकांच्या भेटली येणार, मुरलेल्या गडकोट पंडितांनी-इतिहासकारांनी ज्या ग्रंथराजावर मनभरून शब्दसुमनं उधळली, ज्याची महती पहाडी बुलंद आवाजात जागोजागी गायिली, ज्या ग्रंथराजानं महाराष्ट्रदेशीच्या एकूण-एक गडकोटांना आपल्या कवेत सामावून घेतलंय, तो ग्रंथराज पुन्हा परततोय..
दुर्गनिष्ठांनो-दुर्गबांधवांनो, पायघड्या तयार ठेवा, पायघड्या तयार ठेवा, पायघड्या तयार ठेवा !!!!

“गडकिल्ले महाराष्ट्राचे ( दुसरी आवृत्ती ) ( फक्त हजार प्रती )” लेखक:- दुर्गमहर्षी प्रमोद मारुती मांडे प्रकाशन:- दुर्गमहर्षी प्रमोद मारुती मांडे विचार मंच । मराठी देशा प्रकाशन ४५० पानं । संपूर्ण आर्ट पेपर । संपूर्ण फोर कलर प्रिंटींग । पुठ्ठा बाइंडिंग ( hardbound binding ) ।किंमत ९९५ मात्र । प्रकाशनपूर्व सवलत ६५०-/- ( पोस्टेज खर्च वेगळा ) ( ग्रंथ डिसेंबर १८ ला उपलब्ध होईल. )
“”तब्बल दहा वर्षांनी दुसरी आवृत्ती प्रकाशित होत असूनही ग्रंथाच्या किमतीत अगदी माफक बदल करण्यात आला आहे. गेल्या १० वर्षात सर्व गोष्टींचे दाम दसपटीनं वाढलेले आहेत, तरी ही आवृत्ती जन-आवृत्ती व्हावी ही दुर्गमहर्षी प्रमोद मांडे सरांची इच्छा असल्याकारणे ग्रंथाची किंमत आटोक्यात ठेवली आहे.
प्रकाशनपूर्व बुकिंगसाठी संपर्क:- 95 79 40 78 00 ( राहुल ) 99 70 42 96 56 ( कुलदीप ) 92 09 20 99 70 ( वैभव ) 94 21 05 18 89 ( मगदूम सर )

ऑनलाईन बुकिंगसाठी खाते क्रमांक:- Account name: Marathidesha Foundation Account Number: 051620110000425 IFSC code: BKID0000516 Bank of India, Pashan Road, Abhimanshree Socity ,Pune-411008
( पुस्तकासाठी खात्यावर पैसे भरल्यावर त्याची रिसीट marathidesha@gmail.com या ID वर मेल करावी. त्या मेलमध्ये संपूर्ण नाव- संपूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर दिलेला असावा. वर दिलेल्या मोबाईल पैकी कोणत्याही एका नंबरवर फोन करून पैसे ट्रान्सफरबद्दल अपडेट द्यावा. )

Comments

comments

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

शाहु महाराज खरे लोकराजे…. 1

आठवडी बाजार संपला होता. माणसं बैल जुंपून घराकडे निघाली होती. आया-बाया चपला फरफटत पाय उचलत होत्या. धुरळ्याची रंगपंचमी झाली होती नुसती. म्हातारी आजी पाटी कमरेवर घेऊन ताठ उभी राहिली. फाटक्या चपलेला वादी बांधून त्यात पाय सरकवला. धूळ खाऊन मातकट झालेली चुंबळ रिकाम्या पाटीत टाकली. लाडवांची पुरचुंडी पिशवीत चुंबळीच्या पदराखाली सरकवली.

आजी एस्.टी.च्या खांबाशी पोहोचते, तो एस्.टी.निघून गेली होती. बांगडीवाल्या मुलाने तिला हटकलंच, म्हातारे, आज उशीरसा?’ माल संपेसंपेतो उशीर झाला होता. पण आज बक्कळ पैसे जमले होते. त्यातूनच तिनं खरेदी केली होती. कुणाला तरी हे उत्साहानं सांगावं, असं तिला पण वाटत होतं. तेवढ्यात समोरुन मोटार येताना दिसली.

आजीने चटकन विचार केला, एस्.टी.ला दोन आणे पडणारच होते. याला एक आणा जास्त देऊ. पण अंधारायच्या आतं घरी तर पोहोचू आजीने आपला काळा फाटकोळा हात झेंड्यासारखा हलवला. गाडी कचकन ब्रेक लावून थांबली. ड्रॉयव्हर तसा रुबाबदार गडी वाटला. तो आजीकडे बघून हसला. “काय पायजे आजी?” त्यानं विचारलं. आजीला त्यातला त्यात बर वाटलं. म्हणाली, “माका सत्तर मैलार जांवचा आसा. सोडशील रे? “यष्टी चुकली बग’ ड्रॉयव्हर खाली उतरला.

म्हातारीची पाटी डिकीत टाकली आणि तिला आपल्या बाजूच्या सीटवर बसायला सांगितलं. आजी हरकली. चक्क पुढं बसून जायचं? आणि गाडीत कोणी पॅसेंजर्च नाही. पण तिला हळहळपण वाटली. बिचाऱ्या ड्रॉयव्हरला आज मिळकतच नाही. ती म्हणाली, “ह्यां बग, यष्टीवाले दोन आने घेता. मियां तुका तीन आणे देतयं. चलात?”

ड्रॉयव्हर हसत म्हणाला, “आजी, तुला परवडतील ते दे. तू मला मायसारखी ”
आजीचा जीव सुपाएवढा झाला. ती मायच्याच हक्कानं ऐसपैस बसली. गाडी सुरु झाली.

बांगडीवाला मुलगा तोंड वासून आश्चर्यानं पाहत होता. गाडी हलली तसा तो ओरडलाच, “अगे म्हातारे….. पण आजीला आता त्याच्याकडे बघायला सवड कुठं होती?

मऊ गादीवर आजीला फार सुख वाटलं, एस्.टी.सारखी गर्दी नाही, कचकच नाही. गाडी कशी भन्नाट निघाली होती. आजीनं मनातल्या मनात ड्रॉयव्हरला मार्क देऊन टाकले.

दिवस भराच्या उन्हान,धुळीनं ती थकली होती. आता निवांत झाल्यावर तिला छान डुलकी आली. “आजी, तुझा सत्तर मैलाच्या दगड आला बघं. इथंच उतरायच ना?” आजी खडबडून उठली. कनवटीचे तीन आणे काढून ड्रॉयव्हरच्याहातावर ठेवले. तेवढ्यात त्यान डिकीतून तिची पाटी काढून दिली.

म्हाताऱ्या आजीला काय वाटलं कोण जाणे.तिनं अलवार हातानं पुडी उलगडली. त्यातला शेवकांडचा एक लाडू काढला. ड्रॉयव्हरच्या हातावर टेकवत म्हणाली, “खा माझ्या पुता” ड्रॉयव्हरनं हातातल्या लाडवाकडं आणि म्हातारीकडं डोळे भरुन पाहिलं.

गाडी निघाली, तसा बाजूला उभा असलेला माणूस म्हणाला,
“कुणाच्या गाडीतून इलंय?” “टुरिंग गाडीतनं.” आजी म्हणाली आजीचं बोलणं ऐकून तो माणूस आणखीच बुचकळ्यात पडला.

तशी आजी खणखणीत आवाजात म्हणाली “तीन आणे मोजून दिलंय त्येका”, “त्यांनी ते घेतलं? अग म्हातारे तुझं डोकं फिरलं काय? टुरिंग कार नव्हती ती. आपल्या राजांची गाडी. या आपल्या कोल्हापूरच्या शाहु महाराजांच्या शेजारी बसून आलीस तू ‘ दुसऱ्यानं माहिती पुरवली.

“अरेा माझ्या सोमेश्वरा, खळनाथा” म्हणत म्हातारी भुईला टेकली. गाडी गेली त्या दिशेनं तिनं भक्तिभावानं हात जोडले. आपल्याला `माय’ म्हणणाऱ्या आणि गरिबांच्या टोपलीतला शेवकांडाचा लाडू खाणाऱ्या,त्या लोकराजाच्या आठवणीनं, तिच अंतःकरण भरुन आलं. याला म्हणतात ” #लोकराजा_राजर्षी_शाहू_महाराज”

Comments

comments

हंपी कर्नाटक येथील विठ्ठल मंदीर… 0

पंढरपूर च्या विठ्ठलासाठी विजयनगर साम्राज्याचे सम्राट कृष्ण देवरायानी हंपी येथे जगप्रसिद्ध विठ्ठल मंदिर बाधंले व अशी अख्यायिका आहे की पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ति हंपीला घेऊन या रथामध्ये स्थापन केली …परंतु स्वप्नात विठ्ठलाने त्यांना दृष्टांत दिला व परत पंढरपूररात ठेवण्याची आदेश दिला…नाराज झालेल्या कृष्णदेवरायानी पुन्हा या मंदिरात विठ्ठल मूर्ति स्थापन केली नाही आजही पंढरपूर च्या विठ्ठलाच्या प्रतिक्षेत हे मंदिर उभं आहे सोलापूर शहरापासून फक्त 350 कि मी वर हंपी शहर आहे

कानडाऊ विठ्ठलु.. कर्नाटकु.. तेणे मज लावियाला वेडु…’

१५ व्या शतकातील या मंदिराला वर्ल्ड हेरीटेजचा दर्जा मिळाला आहे.

विठ्ठल मंदिराचे म्युझिक स्तंभ… पोकळ नसून त्यातून आजही ‘सरगम’चा निनाद

हे विठ्ठल मंदिर “कर्नाटकाच्या हम्पी या गावात आहे ..अतिशय सुंदर आणि हे मंदिर स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे.तुंगभद्रेच्या काठावर वसलेल्या कर्नाटकातील हंपीतील विठ्ठल मंदिर म्हणजे स्थापत्य शास्त्राचा एक उत्कृष्ट नमूना आहे
विजयनगरच्या साम्राज्यातील राजा कृष्णदेवराय याच्या कारकिर्दीत हे मंदिर बांधून पूर्ण झाले. मंदिराचे बांधकाम द्रविडी शैलीतील आहे. मंदिराच्या चाहु बाजूंना उंच तटबंधी आहे. त्यामध्ये एक मुख्य मंदिर आणि आजूबाजूला छोटी मंदिरे आहेत. मंदिराच्या पूर्वेकडून प्रवेश करताच आपण वेगळ्याच जगात पोहोचल्याचा भास होतो.

मंदिरात एकामागे एक चार पीठ आहेत. रथ पीठ, ध्वज पीठ, ज्योती पीठ, डाली पीठ आणि तुळशी वृंदावन. आपली घरात पूर्वीच्या काळी तुळशी वृंदावन असायचे ते कदाचित याच द्रविडी शैलीचा एक भाग होते. रथ पीठ म्हणजे दगडी रथ. त्यात विष्णूचे वाहन गरुड विराजमान आहेत. हा रथ म्हणजे हंपीमधील केंद्रबिंदू आहे. या दगडी रथाची चाके फिरून त्यामधून भगवान गरुड विष्णूला वंदन करायला जातात,

Karnatak
Karnatak Hmpi Vithal Temple

मंदिरात चारही बाजूंना चार मंडप आहेत पाकगृह मंडप, भजनगृह मंडप, पांडुरंग-रखुमाई कल्याण मंडप आणि मध्यभागी महामंडप. कल्याण मंडपात विठ्ठल रखुमाईच्या लग्नाचा सोहळा साजरा केला जाई. त्या मंडपात विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत. संपूर्ण विठ्ठल मंदिरातील स्तंभ, संगीत-स्तंभ म्हणून ओळखले जातात. हे स्तंभ पोकळ नाहीत. असे अजूनही त्या स्तंभांमधून आजही ‘सारेगामापाधानिसा’चा निनाद ऐकू येतो.

मध्यभागी असलेल्या महामंडपात विठ्ठल मंदिर आहे. मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात पूर्वी विठ्ठलाची मूर्ती होती. आज ती तिथे नाही. आता ती मूर्ती महाराष्ट्रातील पंढरपुरात आहे असे तेथील लोकांनी सांगितले. मूर्ती तेथे नसली तरी मंदिराचे पावित्र्य आजही जपलेले आहे. ‘पांडुरंग कांती दिव्या तेज झळकती’ या ओवीची प्रचीती आजही त्या महामंडपात येते. मुख्य गाभाऱ्याच्या बाजूने एक छुपा प्रदिक्षणा मार्ग आहे. तो केवळ राज घराण्यातील लोकांसाठी मर्यादित होता.

कृष्ण देवा रायाच्या वर्षातून एकदा विठ्ठलाची महा पूजा होत असे. त्यावेळी राजा कृष्ण देवारायाची राणी चेन्नम्मा या महामंडपात नृत्य सादर करत असे. त्या वेळेस दूर देशीतून कलाकार आपली कला सादर करण्यास यायचे. महामंडपात चीनी सुमो करताना कोरलेले आढळतात. मंडपाबाहेर पोर्तुगीज, चीनी अशा परदेशी लोकांची शिल्पे आहेत. म्हणजे १५ व्या शतकात सुद्धा इतक्या दूर लोक येत असत. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही महिला फौजींची शिल्पे आहेत, एक महिला वाघाशी लढत आहे तर दुसऱ्यात युद्धात लढणारी स्त्री दिसते. विजयनगरच्या सैन्यात स्त्रियांनाही प्रवेश होता हे पाहून आश्चर्य वाटते.

महामंडपाच्या मागील बाजूस देवी लक्ष्मीचे मंदिर आहे. हिंदू पुराणाप्रमाणे माता लक्ष्मी ही भगवान विष्णुंची सहचारणी होती. मंदिर परिसरात कित्येक शीला लेख आढळतात. मंदिरात वेळ कसा निघून जातो काही कळतच नाही.आपल्या विठोबासाठी बांधलेले इतके उत्कृष्ट मंदिर पाहून डोळे धन्य होतात. आपल्या महाराष्ट्राचे आद्य दैवत असलेल्या विठ्ठलावर कर्नाटकामध्येही पूर्वीपासून असलेली श्रद्धा, भक्ती पाहून डोळे पाणावतात. आणि नकळत ओळी आठवतात ‘कानडाऊ विठ्ठलु.. कर्नाटकु.. तेणे मज लावियाला वेडु

पोस्ट साभार – माझं पान

Comments

comments

कुठे आहेत छत्रपती शिवरायांची अस्सल चित्रे ? 0

छत्रपती शिवरायांची अस्सल चित्रे !

शिवाजी महाराजांची अनेक अस्सल चित्रे आज उपलब्ध आहेत, परंतु त्यातील बहुतांश चित्र हि परदेशात आहेत. भारतात उपलब्ध असलेली बहुतांश चित्र हि बरीच अलीकडची आहेत.अनेक चित्रांवर तारीख नसल्याने तत्कालीन कलेक्शन करणार्याने लिहिलेल्या नोट्सवर तारीख अवलंबून आहे किंवा अंदाजावर तारीख मांडता येते. मनुची कलेक्शन ची २चित्र आणि किशनगड चे चित्र सोडता बाकीच्या चित्रांचे चित्रकार उपलब्ध नाहीत.

आजवर उपलब्ध असलेल्या शिवरायांच्या सर्व अस्सल चित्रांचा हा घेतलेला मागोवा –

(डावीकडून उजवीकडे चित्र पहावीत )

Shivaji Maharaj
Shivaji Maharaj Orignal Photos

1.मनुची चित्र संग्रह – 1672 च्या आसपासचे, मनुचीने भारतातील 56 राजे-बादशाह यांची चित्रे मीर महम्मद कडून तयार केली होती.त्यातील हे चित्र आहे. सध्या हे चित्र पॅरिस मध्ये आहे.
2.किशनगड चित्रशाळा – हे चित्र किशनगड मध्ये तयार केले असून ते 1750 नंतरचे असावे कारण अशी चित्रे तेथील प्रसिद्ध चित्रकार निहाल चंद ने काढली आहेत. हे चित्र सध्या बॉनहॅम्स कलेक्शन लंडन येथे आहे.
3.राजपूत शैली – राजपुती शैलीतील हे चित्र राजस्थान मध्ये काढले गेले असून, 1750 नंतरचे असावे.जगजितसिंह गायकवाड यांचेकडून हे प्राप्त झाले.
4.रॉबर्ट ऑर्म कलेक्शन – हिस्टोरीकल फ्रॅगमेंट्स या ऑर्म च्या पुस्तकात हे चित्र आले आहे, 1782 साली हे पुस्तक आले होते ,हे पेंटिंग 1782 च्या आधीचे आहे.

5.अश्वारूढ शिवराय – 1785, 1821,1831 च्या युनिव्हर्स पिक्चरस्क आणि इंडे या डिडॉट च्या ग्रंथात हि चित्र आले आहे.हे चित्र अँटोन झेनेटी ने काढलेआहे.
चित्राचा काळ 1705-1741 असावा. झेनेटी ने हे चित्र मनुची साठी काढले असण्याची शक्यता आहे. मूळ चित्र कॉपर एनग्रेव्हड असून त्यावर रंगकाम केले आहे.
6.मुंबईतील चित्र- हे प्रसिद्ध चित्र टाटा कलेक्शन मधील असून 1675 नंतर गोवळकोंडा येथे काढले असावे. छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालय,मुंबई येथे चित्र सध्या आहे.
7.फ्रांस राष्ट्रीय ग्रंथालय – वृद्धावस्थेकडे झुकलेले शिवराय हे चित्र 1685 सालचे गोवळकोंडा येथील आहे. सध्या फ्रांस मध्ये आहे.

8.स्मिथ लेसोफ कलेक्शन – छत्रपती शिवरायांचे हे उभे असलेले , एका हातात तलवार , दुसर्या हातात पट्टा असलेले चित्र फ्रांस च्या राष्ट्रीय ग्रंथालयात आहे. हे चित्र १७व्या शतकाच्या शेवटचे असावे.
9.रिक्स म्युसियम – डाव्या हातात पट्टा, उजव्या हातात तलवार असलेले हे चित्र हॉलंड मधील असून चित्र 1680 च्या आसपासचे असल्याची तिथे नोंद आहे. चित्रावर ‘Siesvage’ लिहिलेले आहे.
10.विटसेन संग्रह – हे चित्र हॉलंड मधील रिक्स म्युसियम येथे आहे, 1675-1685 हा चित्राचा काळ सांगितला जातो. Siwagii Prince in Decam असे चित्रावर लिहिले आहे.
11.बर्लिन,जर्मनी – बर्लिन स्टेट लायब्ररी येथे असणारे हे चित्र आहे, या चित्रावर ‘Siuwagie gewerzere maratise vorst’ असे लिहिले आहे. ज्याचा अर्थ मराठ्यांचा राजा असा होतो. चित्र 1700 च्या पूर्वीचे असून, तत्कालीन भारतातून हॉलंड नंतर तेथून जर्मनी येथे नेले आहे.

12.गीमे म्युसियम – पॅरिस फ्रांस येथील मुघल शैलीतील हे शिवरायांचे चित्र आहे. चित्राचे वैशिठ्य म्हणजे या चित्रात त्यांचा पूर्ण चेहरा दिसत आहे.
13.ब्रिटिश म्युसियम – लंडन येथे सध्या असणारे शिवाजी महाराजांचे चित्र पोर्टरेट्स ऑफ इंडियन प्रिन्सेस या अल्बम मधील आहे. चित्र गोवळकोंडा येथे बनवले असून काळ 1680 ते 1687 नोंदवला आहे.
14.फ्रांस्वा वॅलेंटिन संग्रह – भिंतीवर हात ठेवलेले हे शिवाजी राजांचे वैशिष्ठयपूर्ण चित्र हे फ्रांस्वा वॅलेंटिन ह्या डच अधिकाराच्या संग्रहातील आहे. चित्र 1782 मध्ये प्रसिद्ध झाले असून ते 1712 च्या आधीचे असावे. चित्रावर ‘dwn hee Seva Gi’ लिहिले आहे.
15.लेनिनग्राड – इंडियन मिनिएचर्स या चीत्रसंग्रहात प्रसिध्द झालेले हे चित्र बर्लिन मधील चित्राशी मिळतेजुळते आहे, हे चित्र हॉलंड मधून प्राप्त झाले असून सध्या रशियन लायब्ररीत आहे.

(सर्व चित्रे शिवकालीन व शिवोत्तरकालीन आहेत, इ.स.१८०० नंतरची चित्र विचारात घेतली नाहीत)

मालोजीराव जगदाळे

Comments

comments